पालकमंत्री संजय सावकारे आणि भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात अप्रत्यक्षपणे सुरू असलेला कलगीतुरा जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रकार विघातक म्हटला जात असून पुढील विधानसभा निवडणुकीत सावकारे यांच्यासमोर अडचणी निर्माण करणारा आहे.
६० लाख रूपयांच्या खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी हे सुमारे सव्वादोन वर्षांचा कारावास भोगून गेल्याच महिन्यात राजकीय जीवनात पुन्हा सक्रिय झाले. तथापि ते परत आल्यापासून त्यांच्यात व एकेकाळचे त्यांचेच चेले पालकमंी संजय सावकारे यांच्यात अप्रत्यक्षपणे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमधील वादावर विरोधकांचे लक्ष असून पुढील निवडणुकीत सावकारे यांना स्वपातील आव्हानालाच तोंड द्यावे लागेल असे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे. चौधरी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत भुसावळ पालिकेची निवडणूक झाली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार सुरेश जैन योंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या त्या निवडणुकीत सावकारे यांनी नियोजनबध्द व संयमपूर्ण हाताळणी करीत सत्ता राष्ट्रवादीकडेच राखण्यात यश मिळविले. पालिकेत सत्ता कायम राहिल्याने आणि तेच प्रमुख सत्ताकेंद्र असल्याने चौधरी यांच्या अनुपस्थितीत सावकारे यांच्याकडेच सर्व सूत्रे आली. तरीही जिल्हा न्यायालयीन कोठडीत असलेले चौधरी त्यांच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याची चर्चा होती.
पालिकेचे मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी तर पालिकेचा कारभार कारागृहातून चालविला जात असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकी, शिवीगाळ करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. अशा परिस्थितीत काम करणे कठीण असल्याने आपणास कार्यमुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर सावकारे आणि चौधरी यांच्यात वाद होऊ लागल्याचे सांगण्यात येते. चौधरी यांची कारागृहातून सुटका झाल्यावर ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आणि राष्ट्रवादीतील या वादाला अधिकच तोंड फुटले. मालक, नोकर, खंडणीखोर, रावण अशा शब्दप्रयोगांचा वापर कोणीही कोणाचे नाव न घेता करू लागल्याने नागरिकांची करमणूक होत आहे. विजयादशमीच्या दिवशी भुसावळात रावण दहन कार्यक्रमात सावकारे यांनी आपण समाजाताील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गुंडगिरी, व खंडणीखोर रावणाचे दहन करू या असे वक्तव्य केले. खंडणीच्या आरोपाखाली कारावास भोगून आलेल्या चौधरींकडे तर सावकारे यांचा रोख नाही ना, याचीही चर्चा सुरू झाली आहे. या दोघा एकेकाळच्या गुरू-शिष्यांमधील वाक् युध्दात कोणीही भारी ठरले तरी ते पक्षासाठी नुकसानकारक असेल असा सूर राष्ट्रवादीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा