हल्लीच्या युगात पत्रकारांना राजकीय क्षेत्र खुणावू लागले असताना अनेक अभिनेत्यांना पत्रकारितेने वेड लावले आहे. पूर्वी ‘कलमवाली बाई’ म्हणून गाजलेल्या डिंपल कपाडियापासून ते सध्याच्या कोंकणा सेनशर्मापर्यंत अनेक कलाकारांनी आपले पाय पत्रकारांच्या चपलेत सरकावून बघितले आहेत. यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे सयाजी शिंदे! ‘सत ना गत’ या चित्रपटात सयाजी शिंदे हे फक्त पत्रकारच नाही, तर तालुका स्तरावरील एका वृत्तपत्राचे मालक-संपादक बनले आहेत.
‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर देविशा फिल्म्स राजन खान यांच्या ‘सत ना गत’ या कादंबरीवर आधारित चित्रपट करत आहेत. यात सयाजी शिंदे, महेश मांजरेकर आणि भरत जाधव हे तिघेही एकत्र आले आहेत. हे तीन कलाकार एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या चित्रपटातील आपल्या भूमिकेच्या निमित्ताने सयाजी शिंदे यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘सत ना गत’ ही कादंबरी आपण आधी वाचली होती. मात्र चित्रपट तयार होत असताना अरविंद जगताप यांनी माझ्या भूमिकेचे अनेक चांगले पदर मला उलगडून दाखवले, असे सयाजी म्हणाले. हा माणूस अत्यंत उचापत्या करणारा असून चेहऱ्यावर एक आणि आत दुसरेच, असा आहे. म्हणजे तो वरवर स्त्री संरक्षणाच्या गप्पा करतो, तर येणाऱ्या-जाणाऱ्या बायकांना चौकस नजरेने न्याहाळतो. ही दुटप्पी भूमिका साकारताना खूप मजा आल्याचे त्यांनी सांगितले.
भरत जाधव, महेश मांजरेकर हे दोघेही रंगभूमीवर घडलेले कलाकार असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याची मजा औरच होती, असेही सयाजी यांनी सांगितले. महेश स्वत: दिग्दर्शक असल्याने राजू पार्सेकर आणि त्याच्यामध्ये खूप चर्चा व्हायची. ती चर्चा ऐकणेही खूप मस्त होते, असे त्यांनी नमूद केले. या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांबरोबर काम करण्याची एक इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा