परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे आणि रिक्षा युनियनच्या पाठिंब्याच्या जोरावर वांद्रे टर्मिनस ते वांद्रे स्थानक दरम्यान अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे.
वांद्रे टर्मिनस ते वांद्रे रेल्वे स्थानक दरम्यानचे साधारण एक किमी अंतर पार करण्यासाठी नियमित रिक्षाला १५ रुपये आकारण्यात येतात. शेअर रिक्षा असेल तर प्रति प्रवासी सात ते आठ रुपये घेण्यात येतात. मात्र एका रिक्षात किमान सात ते आठ प्रवासी सामानासह भरून प्रत्येक प्रवाशामागे १५ रुपये घेत त्यांना टर्मिनसवर घेऊन जाणे किंवा तेथून रेल्वे स्थानकात आणणे, हा उद्योग येथील अनेकांनी सुरू केला आहे. नियमित रिक्षा (काळ्या-पिवळ्या)या केवळ नावाला तेथे दिसतात. मात्र खासगी रिक्षा असल्याचे दाखवत या रिक्षा (संपूर्ण काळ्या रंगाच्या) प्रवासी वाहतूक करत असतात. या रिक्षांना मीटर नसते. त्यांना कोणाची परवानगीही लागत नाही. उलट तेथे कधीकाळी दिसणारा वाहतूक पोलीसही हल्ली दिसेनासा झाला आहे. यातील काही रिक्षांचे क्रमांक अधिकृत नसल्याचे रिक्षा चालकांचेच म्हणणे आहे.अनधिकृत रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करा, असा क्वचित आग्रह धरणाऱ्या मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियननेही या रिक्षांतून चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक लोकांच्या दादागिरीपुढे आम्ही काही करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तर स्थानिकांच्या दादागिरीपुढेच वाहतूक पोलीसही कारवाई करण्यास तयार नाहीत. आठवडय़ाचे पाच दिवस (त्यात शुक्रवार नाही) एका बाजूला उभे राहत किंवा तेथे सर्वाधिक आवाज करणाऱ्या रिक्षाचालकाबरोबर चहा घेत फिरणाऱ्या वाहतूक पोलिसाचे लक्ष या प्रकारांकडे क्वचितच जाते आम्ही टर्मिनसकडे काय चालते याकडे पाहत नाही, असे स्पष्टपणे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. हे सांगत असताना त्याने आपल्या नावाची पाटी काढलेली होती. आम्ही कारवाई केली तर उद्या आम्हाला येथे पुन्हा उभे राहता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. येथील पोलीस चौकीतील अधिकाऱ्यास विचारले असता, अशी कारवाई करणे म्हणजे नाहक दंगल पेटविण्यासारखे असल्याचे सांगितले. बेरोजगारांना रोजगार मिळतोय, तर त्यांच्यावर कारवाई कशाला करायची, असा प्रश्न त्या अधिकाऱ्याने उपस्थित केला. परिवहन विभागाकडे याबाबत विचारणा केली असता पश्चिम उपनगर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्याची तयारी दाखवली. मात्र परिवहन विभागाकडे गस्ती पथकांची (फ्लाइंग स्क्वाड) आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कारवाईवर बंधने येतात. नियमित कारवाई करणे हे वाहतूक विभागाचे काम असून त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई नियमित करणे आवश्यक आहे. आम्ही वारंवार वाहतूक विभागाला कारवाईसाठी कळविले मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाअभावी वांद्रे टर्मिनस ते वांद्रे स्थानक दरम्यान अनधिकृत रिक्षा व्यवसाय फोफावतो आहे.
हे घ्या रिक्षा क्रमांक
रिक्षा क्रमांक द्या, कारवाई करतो असे परिवहन विभागाकडून सांगण्यात येते. एका रविवारी अवघ्या अध्र्या तासात मिळालेले काही क्रमांक पुढीलप्रमाणे. या रिक्षांपैकी काही रिक्षांवर बनावट क्रमांक आहेत. हे क्रमांक पुढीलप्रमाणे : एमएच ०२ एल ९०७०, एमएच ०२ एल ९३६४, एमएच ०२ एल ९२४०, एमएच ०२ एल ९७१४, एमएच ०२ एल ९७३६, एमएच ०२ एल ९६८४, एमएच ०२ एल ९७८७, एमएच ०२ एल ९१७८, एमएच ०२ एस ६९५१, एमएच ०२ एस ९७७६, एमएच ०२ एस ९९०४, एमएच ०२ एस ९९१०, एमएच ०२ एस ९४७९, एमएच ०२ एस ७३६५, एमएच ०२ एस ९७१७, एमएच ०२ एआर ७३९९, एमएच ०३ २९८८ आणि एमएच ०४ सीझेड ५४८६.
म्हणे कारवाई केली तर दंगल पेटेल!
परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे आणि रिक्षा युनियनच्या पाठिंब्याच्या जोरावर वांद्रे टर्मिनस ते वांद्रे स्थानक दरम्यान अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे.
First published on: 07-02-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Says that if action will taken then protest will take