नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १४९ कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येऊन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार आणि इतर सात संचालकांच्या विरोधात आरोप सिद्ध झाले पण, या गैरव्यवहारामुळे सामान्य माणूस, शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
या मध्यवर्ती बँकेच्या तालुका शाखेतील खातेदार आता गांधीसागरजवळच्या मुख्य कार्यालयात धाव घेऊन त्यांच्याच पैशासाठी विनवणी करीत आहेत. पैसे मिळत नसल्याने शेतीची कामे करणे अवघड झाले असून त्यांच्या मुला- मुलींचा विवाह तुटण्याची वेळ आली आहे. खातेदारांना त्यांच्याच पैशांसाठी बँकेत चकरा माराव्या लागत आहे. फाटलेले कपडे, पोटात अन्नाचा कण नसलेले शेतकरी बँकेत येऊन पैशाची मागणी करीत आहेत. त्यांना गावाकडच्या शाखेत ५०० रुपये मिळतात. त्या शाखेकडूनच त्यांना मुख्य कार्यालयात पाठवले जाते. तालुक्यातून आलेल्या लोकांना नागपूरची माहिती नसते. उपाशीतापाशी पोटी ते बँकेत फेऱ्या मारत आहेत. मात्र, पैसे मिळत नसल्याने निराश होत आहेत. बँकेपेक्षाही सोसायटीचे जाळे गावोगाव, खेडय़ापाडय़ात पसरले आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी कर्ज घेणे, बी-बियाणे घेणे सोसायटय़ांमुळे सहज शक्य होते. सोसायटय़ांची गुंतवणूक याच सहकारी बँकेत आहे. त्यामुळे सोसायटीचे लोकही बँकेत येऊन पैशाची मागणी करीत आहेत. बँकेतील अधिकारीही हतबल असल्याने नागरिकांसमोर येत नाहीत. कर्मचाऱ्यांचे चार-चार महिन्यांपासून वेतन नाही. एकूणच सामान्य माणूस शेतकरी, हातमजुरी करणाऱ्यांना पैसे मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने पैसे मिळतील की नाही, या शंकेमुळे त्यांना निराशेने ग्रासले आहे.
बँकेच्या बुटीबोरी शाखेतील खातेदार लक्ष्मण धोंडोबा मारबते यांनी हातमजुरी करून एका वर्षांसाठी ४० हजार रुपये बँकेत ठेवले. त्यांच्या मुलाचे लग्न येत्या १६ मे रोजी आहे. आज तीन तास ते अर्ज घेऊन बँकेच्या मुख्य कार्यालयात पैसे घेण्यासाठी आले. त्यांना पैसे तर मिळाले नाहीच पण, नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. ते म्हणाले, मुलाच्या लग्नासाठी आशेने पैसे ठेवले. ते देत नाहीत. ज्यांच्यावर कर्ज आहे. ज्यांनी बँकेला लुटले त्यांची जप्ती होत नाही. पण पै पै जोडून मुलाच्या लग्नाला पैसा कामी लावण्यासाठी बँकेत पैसे ठेवले तर आमचाच पैसा आम्हाला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नरखेड तालुक्यातील मोवाड शाखेचे पंजाबराव नान्हे मजुरी सोडून शंभर सव्वाशे किलोमीटरवरील बँकेच्या मुख्यालयात पैशासाठी आले. त्यांच्या मुलीचे येत्या २५ मे रोजी लग्न आहे. त्यांनी १५ दिवसांपूर्वी अर्ज करून मुलीच्या लग्नाची पत्रिका अर्जाला जोडल्यानंतर आज त्यांना ५० हजारांऐवजी २५ हजार मिळाले.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहारामुळे सामान्य खातेदारांचे हाल
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १४९ कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येऊन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार आणि इतर सात संचालकांच्या विरोधात आरोप सिद्ध झाले पण, या गैरव्यवहारामुळे सामान्य माणूस, शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
आणखी वाचा
First published on: 07-05-2014 at 09:51 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scam in nagpur district central cooperative bank