महानगरपालिकेच्या पारगमन कराच्या वसुलीत संबंधित ठेकेदाराने तब्बल २५ कोटी रुपयांचा घोटाळा केला असून मनपा अधिका-यांच्या संगनमतानेच ही लूट सुरू असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
काळे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना सविस्तर निवेदन दिले असून, त्यात पारगमन करवसुलीच्या ठेक्याशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. काळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मनपा ते मंत्रालयाच्या स्तरावर या गोष्टीचा पाठपुरावा करीत आहेत. याबाबत मनपा करीत असलेला खुलासाही त्यांनी फेटाळला आहे. या वसुलीतील घोटाळा बाहेर काढतानाच काळे यांनी मनपाला त्यावरील उपायही सुचवले आहेत.
रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काळे यांनी म्हटले आहे, की नगर शहरातून महत्त्वाचे चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग जातो. या सर्व मार्गावर मनपाचे सात ते आठ पारगमन वसुली नाके असून खासगीकरणातून ठेकेदारामार्फत ही वसुली केले जाते. संकलन अभिकर्ता मे. मॅक्सलिंक या व्यावसायिक संस्थेमार्फत शहरात ही वसुली सुरू आहेत. वाहनचालकांकडून हा ठेकेदार सर्रास अतिरिक्त दराने वसुली करीत असून त्यातून कोटय़वधींची लूट सुरू आहे. शहरातून जाणारे सर्व राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावरून दररोज साधारणपणे साडेसहा हजार वाहने ये-जा करतात. एका नाक्यावरून साधारणपणे ६०० ते १ हजार १०० वाहने ये-जा करतात. या गणनेनुसार वर्षांला साधारणपणे २३ लाख ३६ हजार वाहनांची ये-जा होते.
पारगमन कराची वसुली करणारा ठेकेदार व त्याचे गुंड कर्मचारी दमबाजी करून वाहनचालकांकडून खुलेआम अतिरिक्त वसुली करतात असा आरोप काळे यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की प्रत्येक वाहनामागे बेकायदेशीररीत्या सरासरी १०० रुपयांची अतिरिक्त वसुली केली जाते. वर्षभरात येथून ये-जा करणा-या वाहनांची संख्या लक्षात घेता हा तब्बल साडेतेहतीस कोटींचा घोटाळा असल्याचा दावा काळे यांनी केला आहे. ठेकेदाराच्या या गुंडगिरीमुळेच या नाक्यांवर नेहमीच वाहनचालकांशी भांडणे, वेळप्रसंगी दंगलीसारखी स्थिती निर्माण होते. मनपातील अधिका-यांचा वरदहस्त असल्यामुळेच ठेकेदाराची ही मनमानी सुरू असून त्यात लोकांची लूट होत आहे.
काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, पालकमंत्री मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे सचिव आदींचेही या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. वाहनचालकांकडून अतिरिक्त लूट करणा-या ठेकेदाराने पारगमन वसुलीचे सर्व नियमही धाब्यावर बसवल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की मनपातील सत्ताधा-यांचा अधिका-यांवर कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळेच अधिकारी निर्ढावले असून सत्ताधा-यांची ही निष्क्रियताच त्यांना सत्तेतून खाली उतरवील.
याबाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर व हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर येथे विधिमंडळासमोर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.                    
 

Story img Loader