ठाणे जिल्ह्य़ातील अनेक गाव-पाडे तहानलेले असताना लघुपाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे यंदा तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आचारसंहितेनंतर सोमवारी ठाणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ही बाब उघडकीस आली. पालकमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.
 नियोजन मंडळाच्या बैठकीत २०१३-१४च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी लघुपाटबंधारे विभागाकडील १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी परत गेल्याचे लक्षात आणून दिले. आचारसंहिता असल्याने निधी खर्च करता न आल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले, परंतु १ डिसेंबरपासून पाठपुरावा करूनही निविदा प्रक्रिया वेळेत का राबविता आली नाही, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी विचारला. राज्यमंत्री गावीत तसेच आमदार विवेक पंडित यांनीही याबाबतीत नाराजी व्यक्त केली. तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

Story img Loader