गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या गूढ आवाजाने नांदेडकरांची झोप उडवली असतानाच गुरुवारी दुपारी भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. शासकीय पातळीवर याची कुठेही नोंद नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यापीठातील भूकंप अभ्यास केंद्राला भेट दिली. मात्र, गूढ आवाजाचे गुपित उकलण्यासाठी आणली गेलेली साधनसामग्री धूळखात पडून असल्याचे पाहून ते अवाक झाले.
सन २००५पासून शहराच्या विशिष्ट भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. वारंवार होणाऱ्या या आवाजाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने निधीची तरतूद केली होती. विद्यापीठात या आवाजाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून त्याला घसघशीत निधी दिला. परंतु हे आवाज कशाचे आहेत, त्याचे गूढ उकलण्यात यश आले नाही. पूर्वी मध्यरात्री जाणवणारे हे धक्के आता दिवसा जाणवू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी अशा धक्क्याचा अनुभव आल्यानंतर गुरुवारी दुपारी बारा-एकच्या दरम्यान भूकंपाच्या तीन धक्क्यांनी नांदेडकरांची झोप उडवली. घाबरू नका, सावधगिरी बाळगा, असे प्रशासनाकडून सांगितले जात होते. दुसरीकडे विद्यापीठात स्थापन अभ्यासकेंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. महापालिकेने शहरातील वेगवेगळय़ा िभतीवर भूकंप आल्यास काय करावे, काय करू नये याची माहिती सांगून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
शहरात जाणवणारे धक्के भूकंपाचे की अन्य कशाचे, याच्या अभ्यासासाठी विद्यापीठात स्थापन केलेल्या पथकाला पूर्वी ५० लाखांचा व दोन वर्षांपूर्वी पुन्हा ५० लाख निधी देण्यात आला. केंद्राचे प्रमुख सध्या अपघातग्रस्त असल्याने घरीच आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वामी यांनी सहकाऱ्यांसह या केंद्राला भेट दिल्यानंतर ते अवाक झाले. गूढ आवाजाचे गुपित उकलण्यासाठी आणलेली साधनसामग्री धूळखात पडून आहे. येथे कोणत्याही कर्मचाऱ्याचा ठावठिकाणा दिसून आला नाही. अभ्यास केंद्राचे प्रमुख अपघातग्रस्त आहेत. कार्यालयात गवत उगवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, ही बाब निदर्शनास आली. याबाबत स्वामी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहेत. विविध संस्थांमधील तज्ज्ञ, तसेच हौशी भूगर्भतज्ज्ञांनी गूढ आवाजाचा अभ्यास केला, पण कोणत्याही निष्कर्षांप्रत ते येऊ शकले नाहीत. हैदराबाद येथील नॅशनल जिओ फिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूटच्या पथकानेही येथे अभ्यास केला. पण ठोस निष्कर्ष न आल्याने नागरिकांची भीती कायम आहे.