महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि विद्या परिषदेने (एससीईआरटी) महाराष्ट्र राज्यासाठी पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम नव्याने तयार केलेल्या अभ्यासक्रमावर सर्व विषयांवर मिळून राज्यभरातून ४ हजार ७५६ प्रतिक्रिया आल्या असून त्यातील समर्पक सूचनांचा आराखडय़ामध्ये समावेश केला जाईल, अशी हमी एससीईआरटीचे संचालक एन. के. जरग यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी एससीईआरटीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एससीईआरटीचे पदाधिकारी, अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याऱ्या अभ्यासमंडळाचे प्रमुख उपस्थित होते. अभ्यासक्रम आराखडय़ाबाबत उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना यावेळी अभ्यासमंडळाच्या लोकांनी उत्तरे दिली. नव्या अभ्यासक्रमामध्ये आपत्ती व्यवस्थापन, ललित कला यांसारख्या नव्या घटकांचाही समावेश करण्यात आला आहे. या शिवाय कार्यानुभव विषयांतर्गत लेदर टेक्नॉलॉजी, सौंदर्य प्रसाधन कला, वाणिज्य व्यवसाय सेवा, आभूषण कला, शेती पूरक व्यवसाय, पशू-पक्षी संवर्धन अशा विविध क्षेत्रांचा इयत्ता सहावीपासून समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रम आराखडा तयार करताना शिक्षण हक्क कायद्यातील विविध मुद्दय़ांचा विचार करण्यात आला असल्याचा दावाही एससीईआरटीने यावेळी केला आहे. या अभ्यासक्रम आराखडय़ावर संपूर्ण राज्यातून ४ हजार ७५६ प्रतिक्रिया आल्या आहेत. पहिली ते आठवीसाठीच्या अकरा विषयांवर मिळून या प्रतिक्रिया आल्या आहेत.
नव्या अभ्यासक्रम आराखडय़ाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०१३ पासून, तिसरी, पाचवी, सातवीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०१४ पासून आणि इयत्ता चौथी, सहावी आणि आठवीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०१५ पासून करण्यात येणार आहे. हा सर्व अभ्यासक्रम आराखडा सात डिसेंबपर्यंत राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

Story img Loader