पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) अभ्यासक्रमामध्ये हैदराबादच्या बिझनेस स्कूलला नागपुरात स्वत:चा कॅम्पस करण्याची इच्छा असून त्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत. जवळपास २०० प्रवेश झाल्यास या ठिकाणी गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट (गितम) या हैदराबादस्थित अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या हैदराबाद बिझनेस स्कूलच्या माध्यमातून एमबीए सुरू करण्याची मनीषा प्रा. मनोहर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. विद्यापीठाच्या देशभरात १२ शाखा आहेत. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात शैक्षणिक सेवा देणाऱ्या या विद्यापीठाकडे गेल्यावर्षी नागपुरातून ८० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी दोघांनी एमबीएसाठी प्रवेश केला. गितम विद्यापीठाची स्वत:ची प्रवेश पात्रता परीक्षा आहे. गेल्या ३ एप्रिलपासून विद्यापीठाने ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरू केली असून येत्या १३ एप्रिलला लेखी परीक्षा आहे. यामध्ये विदर्भातून एक हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले तर या ठिकाणी विद्यापीठाचे कॅम्पस निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणच्या १० विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास त्या ठिकाणी जाऊन मुलाखती घेतल्या जातील. त्यामध्ये समूह चर्चा आणि व्यक्तिगत मुलाखतीचा अंतर्भाव असेल. दोन वर्षांच्या एमबीए अभ्यासक्रमासाठी सहा लाख शुल्क असून त्यामध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांनाच करायची आहे, असे मनोहर यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे डॉ. एस. नारायण राव आणि सहायक जनसंपर्क अधिकारी बी. रामचंद्र राव उपस्थित होते.
हैदराबाद बिझनेस स्कूलच्या माध्यमातून शहरात एमबीए सुरू करण्याची योजना
पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) अभ्यासक्रमामध्ये हैदराबादच्या बिझनेस स्कूलला नागपुरात स्वत:चा कॅम्पस करण्याची इच्छा असून त्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत.
First published on: 09-04-2013 at 02:50 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scheme to start mba thru hyedrabad business school in city