महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या जाहीर झालेल्या ऑनलाइन निकालात मोठय़ा प्रमाणावर गोंधळ झाला असून, शहापूर तालुक्यातील किन्हवली केंद्रात बसलेल्या २२ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थ्यांच्या निकालात तफावत झाल्याचे उघड झाले आहे. तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील एक विद्यार्थी फेरतपासणीनंतर थेट राज्याच्या गुणवत्ता यादीत पोहोचला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे २३ मार्चला शिष्यवृत्ती घेण्यात आली होती. याचा ऑनलाइन निकाल १६ मे रोजी जाहीर झाला होता. जाहीर झालेल्या निकालांमध्ये बऱ्याच प्रमाणात तफावत असून शहापूर तालुक्यातील किन्हवली केंद्रात माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अभिषेक फर्डे या विद्यार्थ्यांला मराठीत ९६, गणितात ९४, तसेच बुद्धिमता चाचणी आणि सामान्यज्ञान विषयात ७४ असे एकूण २३४ गुण मिळाले होते, परंतु अभिषेक चौथीला असताना तो शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा आणि सहावी इयत्तेत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पहिला आला होता. यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत अभिषेकला मिळालेल्या गुणांविषयी पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याने त्यांनी पुणे येथे धाव घेतली. या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या गुणांची पुणे येथे फेरतपासणी केली असता त्याला ७४ ऐवजी ९३ गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले. गुणात भरमसाट वाढ झाल्याने तो राज्य गुणवत्ता यादीत थेट चौथ्या क्रमांकावर, तर ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला.  असाच प्रकार इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीतही समोर आला. निकालात चुका झाल्याचे स्पष्ट झाल्याने गुणवत्ता यादीही आता पुन्हा जाहीर करण्यात येणार असल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याबाबत पुणे येथील महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधला असता एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने जाहीर झालेल्या निकालात तफावत झाल्याचे मान्य केले. याबाबत राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त महावीर माने यांच्याशी साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader