विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लावण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनाला शासनाने आर्थिक प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. येथील क. का. वाघ शिक्षण संस्थेस शुक्रवारी पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ तर प्रमुख पाहुणे म्हणून तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ए. टी. पवार, मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, तुकाराम दिघोळे आदी उपस्थित होते.
क. का. वाघ शिक्षण संस्थेने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबत कृषी, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आदी विषयांचे अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी पूरक व्यवसाय महत्त्वाचे आहेत. पूरक व्यवसायांना अभ्यासक्रमांच्या माध्यमातून गती मिळेल. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. कृषी उत्पादनात देश स्वयंपूर्ण आहे. कृषीमालाच्या निर्यातीतून शेतकऱ्यांना परकीय चलन मिळत असल्याचे पवार यांनी नमूद केले. काकासाहेब वाघ यांनी शैक्षणिक व सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून सामान्य माणसांसाठी लढणारा योद्धा म्हणून त्यांचा गौरव केला जातो. क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी क्षेत्रातील शैक्षणिक काम दर्जेदार असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा