येथील शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयात रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष डी. आर. पाटील, सचिव सरिता नारंग, मुख्याध्यापिका ज्योती चौधरी, प्रभाकर दवंडे, भल्लाशेठ राठी, कॅप्टन सुरेश आव्हाड, अवतार पनफेर, के. आर. देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. पाटील यांनी या वेळी  विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. या शाळेत शिकणाऱ्या बहुतेक मुली या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असून ज्या विद्यार्थिनी लांबून पायी येत असतील त्यांच्यासाठी एस.टी. पास किंवा सायकलींची व्यवस्था लवकरच करण्यात येईल आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रारंभी मुख्याध्यापिका ज्योती चौधरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. चौधरी यांनी प्रास्ताविकात रोटरीसारखी संस्था शाळेतील मुलींच्या मदतीसाठी पुढे आल्यास शाळेच्या नावलौकिकात भर पडेल, असे सांगितले. रोटरीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी वह्या, कंपासपेटय़ा तसेच दहावीतील विद्यार्थिनींना परीक्षेची पूर्वतयारी करता यावी, यासाठी अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे सर्व साहित्य जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता सुहास पाटील यांनी उपलब्ध करून दिले आहे. रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती उपस्थितांना जितेंद्र भदाणे यांनी दिली.