सायन-पनवेल महामार्गावर भारती विद्यापीठापासून काही अंतरावर बेलापूरजवळ रायन इंटरनॅशनल स्कूलची बस वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाली. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्याने पुढील अनर्थ टळला. खारघर आणि बेलापूर या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या मध्यावरच हा अपघात घडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या हद्दवादाचा उत्तम नमुना येथे अनेकांना पाहावयास मिळाला. दरम्यान या अपघातामुळे बेलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीला फटका बसला. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बस मार्गावरून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे मात्र पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महामार्गावर सुरू असलेले रुंदीकरणाचे काम वाहनचालकांच्या जिवावर बेतले आहे. या ठिकाणी महामार्गावर सिंमेट ब्लॉक, गोणी आणि इतर साहित्य तसेच ठेवण्यात आल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अपघातांची मालिका सुरू असतानादेखील प्रशासनाने कोणताही बोध घेतलेला नाही. खारघर येथील शाळेत विद्यार्थ्यांना सोडून ही बस (एसएच-०४-जी-४०७१) परत वाशीच्या दिशेने निघाली होती.
बेलापूरनजीक एका वाहनाने बसला कट मारला, यावेळी बसचालकाने बस अचानक उजवीकडे वळवली. यावेळी रस्त्यावर असलेल्या सिंमेट ब्लॉकला बस धडकल्याने पलटी झाली. या अपघातामध्ये बसचालकासह बसमध्ये असलेल्या दोन साहाय्यकांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातानंतर बेलापूर आणि खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या मध्यावर हा अपघात झाल्याने या अपघाताची नोंद कोणत्या पोलीस ठाण्यात करायची, यावरून दोन्ही पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगलेल्या वादाचा आनंद बघ्यांनी लुटला.
बेलापूरमध्ये शाळेच्या बसला अपघात
सायन-पनवेल महामार्गावर भारती विद्यापीठापासून काही अंतरावर बेलापूरजवळ रायन इंटरनॅशनल स्कूलची बस वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाली.
![बेलापूरमध्ये शाळेच्या बसला अपघात](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/04/Untitled-11141.jpg?w=1024)
First published on: 29-04-2014 at 07:00 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bus accident at belapur