सीवूड येथील पामबीच मार्गावरील अक्षर चौकात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बसला भाजी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिली. सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यात बसचालकासह पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. अपघातानंतर पिकअप वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून एनआरआय पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती कळताच पालकांनी शाळेमध्ये गर्दी केली होती.
जुईनगर, नेरुळ परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन बस (एमएच ४३ एच १६३८) शाळेच्या दिशेला निघाली होती. चौकामधून बस बेलापूरच्या दिशेला वळत असतानाच वाशीकडून बेलापूरकडे येत असलेल्या पिकअपने (एचएच ४६ ई ५८०५) बसचालकाच्या बाजूकडील मागील भागावर येऊन धडक दिली.
यामुळे बसमधील विद्यार्थी सीटवर व खिडक्यांवर आदळले. त्याचबरोबर खिडकीच्या काचा फुटून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या.
बसचालक शरद घाडे यालादेखील किरकोळ दुखापत झाली. या वेळी सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठी हानी टळली. या घटनेने घाबरलेला पिकअपचालक राजू याने घटनास्थळावरून पळ काढला असल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन बेंद्रे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा