कारवाईस विरोध नाही, असे म्हणत बंद पुकारणाऱ्या शालेय बस मालकांनीही आंदोलन मागे घेतले असून उद्यापासून शालेय बसेस पुन्हा रस्त्यावर धावताना दिसतील. प्रादेशिक परिवहन खात्याची कारवाई मात्र सुरूच राहणार आहे. आज रस्त्यावर अत्यल्पच बसेस आल्याने आज कारवाईही अत्यल्पच झाली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या ऑटो रिक्षांसह सर्व वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून आज दिवसभरात सुमारे पाचशे वाहनांवर कारवाई करण्यात आली.
प्रादेशिक परिवहन खात्याने कालपासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शालेय बस तसेच व्हॅनची तपासणीची मोहीम हाती घेतली. शालेय बस नियमावलीचे निकष न पाळणारे वाहन १२० दिवस निलंबित करण्याचे जाहीर करण्यात आले होते. अनेक शाळांनी ना-हरकत प्रमाणपत्र न दिल्याने परवाना मिळविण्यास उशीर होत असल्याचे कारण पुढे करीत सीटूप्रणीत वाहन चालक, मालक, कामगार युनियनने परवानासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्याची मागणी केली. प्रादेशिक परिवहन खात्याची कारवाई टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अनेक बस, व्हॅन व ऑटो रिक्षा चालकांनी अचानक बंद पुकारला. शालेय बस वाहतूकदार कल्याणकारी संघही त्यात सहभागी झाला. काल दिवसभर प्रादेशिक परिवहन खात्याच्या कार्यालयासमोर निदर्शने झाली. आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख व आमदार कृष्णा खोपडे यांच्या मध्यस्थीनंतर व्हॅन चालक व मालकांनी आंदोलन मागे घेतले. प्रादेशिक परिवहन खात्याने काल वीसहून अधिक बस ताब्यात घेतल्या.
शालेय बस मालकांचा संप सुरूच होता. आज दिवसभर अत्यल्प बसेस रस्त्यावर आल्या. त्यामुळे कारवाईही अत्यल्पच झाली.  शालेय बस वाहतूकदार कल्याणकारी संघाच्या पुढाकाराने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कारवाईस विरोध नाही. मात्र, कारवाईची पद्धत अन्याय करणारी होती. दोन वर्षांपासून नियमावलीची माहिती दिली जात असली तरी त्यात बरेचवेळा सुधारणा झाली. हे निकष पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच तपासणी व कारवाई सुरू झाली. कारवाई सौम्य करा, अशी मागणी होती. रणजित गुलाटी, समर जोग, दिलीप छाजेड, दिनेश सारवे या वाहतूकदारांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले तसेच विद्यार्थ्यांना होणारा त्रास बघता आंदोलन थांबवित असल्याचे  शालेय बस वाहतूकदार कल्याणकारी संघाचे अध्यक्ष राजेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले.  दरम्यान, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या ऑटो रिक्षासह सर्व वाहनांविरु वाहतूक पोलिसांनी कडक कारवाी केली.  वाहतूक पोलीस उपायुक्त जीवराज दाभाडे, रमेश बद्रे, अविनाश मोरे, सुनील शिंदे या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील शहरातील चारशे वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या ऑटो रिक्षा, चारचाकी जीपसह सर्व वाहनांवर कारवाई केली.
जास्तीचे प्रवासी नेण्यासाठी ऑटो रिक्षांनी लाकडी व लोखंडी पाटय़ा लावल्या आहेत.  पोलिसांनी गॅस कटरने या पाटय़ा काढून टाकल्या.
या गाडय़ा चालान करीत यापुढे अधिक प्रवासी नेल्यास कडक कारवाई करण्याची समज त्यांनी देण्यात आली. आज दिवसभरात सुमारे पाचशे वाहनांवर कारवाई करण्यात आली.

Story img Loader