रस्त्यावरून धावणाऱ्या पिवळ्या रंगाच्या स्कूलबसेस एरव्ही अपघातामुळे जास्त चर्चेत येत असल्या तरी हल्ली त्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन धावत असल्यानेही चर्चेत आहेत. शाळा सुरू व्हायला थोडा अवकाश असल्याने त्या वऱ्हाडय़ांच्या दिमतीला उतरवण्यास शाळा व्यवस्थानास रस आहे.
वैदर्भातील कडक उन्हाळ्याची जाण असलेल्या लोकांसाठी आता स्कूल बसेस ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. पूर्वी ट्रक, ट्रॅक्टर किंवा बैलगाडीने वऱ्हाडय़ांची ने-आण केली जायची. उन्ह टाळण्यासाठी रात्रीच्या लग्नांना प्राधान्य दिले जायचे. हल्ली मंगल कार्यालयाच्या उपलब्धतेनुसार लग्न कार्य ठरवले जात असल्याने स्कूल बसेसही त्याप्रमाणे ‘बुकिंग’ केले जात आहे.
मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर दोन महिने हा व्यवसाय चांगलीच वाढतो. त्यातून शाळांनाही उत्पन्न मिळते. खास करून विना अनुदानित शाळांना एक चांगले उत्पन्नाचे साधन यामुळे मिळाले आहे. बसमालकच गाडीचे चालक म्हणून काम करून मुलांच्या शाळा सुरू होईपर्यंत जेवढी कमाई करता येईल, तेवढी करून घेण्यात मग्न आहेत.
नागपूर जिल्ह्य़ात या बसेसची जास्त मागणी आहे. याशिवाय गोंदिया, भंडारा, वर्धा, देवरी, परतवाडा, वरठी, वेलतूर याही ठिकाणी स्कूल बस मनसोक्त धावत आहेत. किलोमीटरप्रमाणे पैशांची देवाणघेवाण केली जाते. गावांच्या अंतरानुसार पैसे ठरवले जातात. खासगी किंवा एस.टी. महामंडळाच्या बसेस काहींना गैरसोयीच्या होतात. हल्ली लोकांकडे पैसाही आहे आणि त्यांना प्रतिष्ठाही हवी आहे. पूर्वी वऱ्हाड वाढले तर तडजोडीची भूमिका घेतली जात नाही. त्या तुलनेत स्कूल बसेस खासगी असल्याने सहज तडजोडीस तयार असतात. म्हणूनच लग्नकार्यासाठी स्कूलबसेसचे भाव वढारले आहेत. स्कूल बसेस, मारुती व्हॅन आता वऱ्हाडय़ांना घेऊन धावत आहेत. त्यासाठी आरटीओशी देवाणघेवाण केली जाते. मात्र वऱ्हाड वाहून नेताना कोंबून भरलेले वऱ्हाडी जेव्हा गाडीत उभे राहतात तेव्हा वाहतूक पोलिसांपासून वाचवण्यासाठी स्कूल बस चालकाला आणि वऱ्हाडय़ांनाही बरीच कसरत करावी लागते.
उन्हाचा कहर लक्षात घेता नागरिकही राज्य परिवहन महामंडळाच्या बस किंवा खासगी ट्रॅव्हल ऐवजी या स्कूल बसला प्राधान्य देताना दिसतात. कारण त्यांच्यापेक्षा निश्चितच कमी भाडय़ावर काम करता येते.

Story img Loader