शाळा सुरू होऊन महिना उलटला, तरी जिल्ह्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके मिळाली नाहीत. बाजारात पुस्तके उपलब्ध झाली असताना सरकारच्या योजनेत मात्र ही पुस्तके प्राप्त झालीच नाहीत, असे सांगण्यात आले.
राज्यभरात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मोफत पाठय़पुस्तके मिळतात. यंदा इयत्ता पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलल्याने पाठय़पुस्तक छपाईला उशीर झाला. त्यामुळे शैक्षणिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके देण्याच्या सरकारच्या घोषणेचा बोजवारा उडाला.
इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके उपलब्ध झाली असली, तरी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला तरी अजून मिळाला नाही. तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या कारकिर्दीत मोफत पाठय़पुस्तकांचे नियोजन चांगल्या प्रकारे होत होते. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ मिळत होता. पण अलीकडच्या काळात नियोजनाअभावी अनागोंदी निर्माण झाली. मोफत पाठय़पुस्तके तयार करणे व त्याचे वितरण यावर मोठा खर्च केला जातो. पुरवठा करण्यासाठी ज्या वाहनांचा उपयोग केला जातो त्याच्या भाडय़ावर उधळपट्टी केली जाते. यंदा मोफत पाठय़पुस्तके जिल्हा पातळीवर पोहोचविण्यासाठी जो खर्च दाखविला आहे, तो अवाक करणारा आहे. एवढी मोठी उधळपट्टी होऊनही पहिल्या दिवशी मोफत पाठय़पुस्तके देण्याच्या योजनेचा बोजवारा उडाला.
विशेष म्हणजे अभ्यासक्रम बदलल्यानंतर पहिली व दुसरीची पुस्तके बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. सरकार मात्र अभ्यासक्रम बदलला, छपाईला विलंब अशी तकलादू कारणे सांगून आपली जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्नात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा