इचलकरंजी येथील लालनगर परिसरातील १२ वर्षीय शाळकरी मुलीचा रविवारी डेंग्यूने मृत्यू झाला. शिवानी दीपक हुनुले असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरातील सर्वच भागात नागरी सुविधा आणि आरोग्याचा बोजवारा उडाला आहे. लालनगर परिसरात तर अस्वच्छतेचा ढिगाराच साचलेला दिसून येतो. आठ दिवसांपूर्वी शिवानी हुनुले, तुषार सुरेश हुनुले, मालन बबन जावळे आणि शब्बीर शेख आदींना डेंग्युसदृश आजाराची लागण झाल्याने पालिकेच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी या सर्वाना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान शिवानी हिचा रविवारी मृत्यू झाला. शिवानीच्या मृत्यूचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून आठ-आठ दिवस कचरा उचलला जात नसल्याने कंटेनर ओसंडून वाहत आहेत. या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून पालिका प्रशासन व सत्तारूढ मंडळी केवळ चर्चा करण्यापलिकडेच काहीच कार्यवाही करीत नाहीत. त्यामुळे अस्वच्छतेचा बोजवारा उडत असून आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे की आणखी बळी जाण्याची प्रतीक्षा करणार असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.