विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय साहित्याची निविदा प्रक्रिया लालफितीच्या कारभारात सापडल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील आठवडय़ात शाळा सुरू झाल्यानंतर तात्काळ शालेय साहित्य मिळण्याची शक्यता कमीच आहे. शालेय साहित्य मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना धीर धरावा लागणार असल्याने शिक्षण मंडळातील सावळागोंधळ चव्हाटय़ावर आला आहे.
जून महिन्यात शाळा सुरू होतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मे महिन्याच्या पंधरवडय़ापर्यंत कायम होती. त्यामुळे शालेय साहित्य मंजुरी प्रक्रियेत अडथळा आला असला तरी आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया प्रशासनाने मंजुरी घेऊन करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया संथगतीने करण्यात आल्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील २० दिवसांहून अधिक काळ गणवेश, बूट, रेनकोट, कंपासपेटी आदी शालेय साहित्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या ७४ शाळा आहेत. त्यामध्ये ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शालेय साहित्य खरेदीसाठी अर्थसंकल्पात अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात यावे, अशी साधारण अपेक्षा असते. मागील काही वर्षांत या प्रक्रियेत होत असलेली दिरंगाई लक्षात घेता सर्वसाधारण सभेने शालेय साहित्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तरीही प्रशासन निविदा प्रक्रिया करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सभागृह नेते कैलास शिंदे यांनी केला. मागील वर्षी शालेय साहित्य खरेदीतील एक कंपास पेटी ६० रुपये किमतीची असताना ती १०० रुपयांना खरेदी केली गेल्याची माहिती उघड झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. पण हा अहवाल अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने या साहित्य खरेदीमधील झारीतील शुक्राचार्य कोण, असा प्रश्न पालिकेत उपस्थित केला जात आहे.
झोपलेले शिक्षण मंडळ
विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाबरोबर सर्वागीण विकास व्हावा म्हणून संगणकाच्या माध्यमातून शिक्षण, दूरस्थ पद्धतीच्या शिक्षण प्रणालीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे प्रस्ताव महापालिकेने तयार केले आहेत. असे असले तरी शिक्षण मंडळातील अधिकारी याविषयी कमालीचे उदासीन असल्याने हे सगळे प्रस्ताव धूळ खात पडले असल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा