नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या स्थानिक शाखेतर्फे अंधांसह कर्णबधिर व बहुविकलांगत्व असलेल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चंद्रभागाबाई नरसिंगदास चांडक कर्णबधिर, अंधत्व व बहुविकलांग’ शाळेचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते होणार आहे.
नॅबच्या स्थानिक शाखेतर्फे अशी शाळा सुरू करण्यासंदर्भात १९९९ पासून प्रयत्न करण्यात येत होते. सिन्नरचे द्वारकानाथ चांडक यांसह इतरांनी आर्थिक साहाय्य केल्याने एका नव्या कक्षात या प्रकल्पास मूर्तस्वरूप आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅब इंडियाचे अध्यक्ष आ. हेमंत टकले हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, अपंग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, प्रसिद्ध उद्योगपती राधाकिसन चांडक आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, बहुविकलांग समितीचे अध्यक्ष अशोक बंग, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात शाळेला आर्थिक सहयोग देणारे देणगीदार चांडक परिवार (सिन्नर), केला, झंवर या परिवारांसह सिएट कंपनी यांचा सत्कार करण्यात येईल. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी सीडी प्लेअरचे वाटप, दृष्टिबाधितांसाठी इको फ्रेण्डली पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरण व दृष्टिबाधित मुलींचे स्त्री-भ्रूण हत्येवर नृत्य, रोप मल्लखांब आणि बहुविकलांग मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2014 रोजी प्रकाशित
चांडक कर्णबधिर, अंधत्व व बहुविकलांग शाळेचे उद्या उद्घाटन
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या स्थानिक शाखेतर्फे अंधांसह कर्णबधिर व बहुविकलांगत्व असलेल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चंद्रभागाबाई नरसिंगदास चांडक कर्णबधिर, अंधत्व व
First published on: 31-07-2014 at 08:31 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School opening