मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून मात्र पावसाने उघडीप दिल्याने दीड महिन्याच्या सुटीनंतर एरवी कंटाळवाणा वाटणारा शाळेचा पहिला दिवस आज उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कालच्या मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. सरकारी धोरणानुसार शहर आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य शाळांमध्ये, विशेषत: प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात आले. जवळपास दोन महिन्यांनी शाळांच्या घंटा वाजू लागल्या आणि शाळांमध्ये पुन्हा किलबिलाटही सुरू झाला..!
जिल्हा परिषद आण महापालिकेच्या विदर्भातील सर्व शाळा सरकारच्या आदेशानुसार आजपासून सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची शाळांनी दोन दिवस आधीच तयारी सुरू केली होती. त्यानंतर आज शहरातील बहुतांश शाळांमधून विद्यार्थ्यांचे मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्य़ातील मौदा, कळमेश्वर, हिंगणा, उमरेड या शिवाय ग़डचिरोली, भंडारा, गोंदिया वर्धा जिल्ह्य़ातील छोटय़ा छोटय़ा गावांतील शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मिरवणूक काढण्यात आल्या तर काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत केले.
सेंट उर्सुला शाळेला शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर यांच्यासह माध्यमिक आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी दर्डा यांनी शाळेतील काही विद्यार्थीनीशी संवाद साधून पुस्तके भेट दिली. शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांची उपस्थित वाढावी आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे दर्डा यांनी यावेळी सांगितले.
फुटाळाजवळील महापालिका शाळेत महापौर अनिल सोले आणि आयुक्त श्याम वर्धने यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे, शिक्षण सभापती चेतना टांक, उपायुक्त हेमंत पवार आदी महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

Story img Loader