अंबड लिंक रोडवरील मोरेनगर परिसरात मंगळवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचा धक्का लागल्याने चाकाखाली सापडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या चालकास पोलिसांनी तातडीने अटक केली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारंग राकेश जाधव (४) असे या बालकाचे नांव आहे. मोरेनगरमध्ये वास्तव्यास असलेला सारंग सिडकोतील उत्तमनगर येथील अभिनव बाल विकास मंदिर शाळेत लहान गटात शिक्षण घेत होता.
ज्या बसमधून तो दररोज शाळेत ये-जा करत असे, ती बसच त्याच्या जीवावर बेतली. अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी निघाली. उपेंद्रनगरलगतच्या मोरेनगर परिसरात बस आल्यावर सारंग खाली उतरला. त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आजी आली होती. बसमधून उतरल्यावर आजीसोबत काही पावले टाकत नाही तोच, या बसचा त्याला धक्का लागला आणि तो मागील चाकाखाली सापडला. अगदी क्षणार्धात घडलेल्या अपघाताची माहिती समजल्यावर स्थानिकांनी लगेच धाव घेतली. सारंगला बाहेर काढून लगतच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
अपघातानंतर बसचालक सोमनाथ वडजे (२६, सुकेणे) याने पोबारा केला. दरम्यानच्या काळात नागरीक मोठय़ा संख्येने जमा झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक गायब झाल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी चालक वडजेला ताब्यात घेतल्याचे कळताच संतप्त नागरिकांनी त्याला आपल्या हवाली करण्याची मागणी केली. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सारंगचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत बस अंबड पोलीस ठाण्यात नेली. अपघातास कारणीभूत ठरल्यावरून चालकाविरुद्ध
गुन्हा दाखल करून बस जप्त करण्यात
आली आहे. दरम्यान, सारंगचे आई-वडील दोघेही औद्योगिक वसाहतीत काम करतात. काही दिवसांपूर्वीच सारंगची शाळा सुरू झाली होती. त्यासाठी कुटुंबियांनी नवनवीन शालेय वस्तुंची खरेदी केली. सारंग शाळेत हळूहळू रमू लागला असतानाच जाधव कुटुंबियांवर हा आघात कोसळला.
बसमधून येणाऱ्या सारंगला थांब्यावरून घरी घेऊन जाणाऱ्या आजीला तर या घटनेनंतर जबर धक्का बसला. नातवाचा अपघाती मृत्यू डोळ्यासमोर पाहणारी आजी एकदम सुन्न होऊन गेली होती.

Story img Loader