गेल्या काही वर्षांत गोदावरीा प्रदुषणाकडे सामाजिक संस्थांसह प्रदुषण नियंत्रण मंडळाने लक्ष वेधले असून  पर्यावरण संवर्धनासाठी उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता पालिका प्रशासनासह शिक्षण मंडळानेही कंबर कसली आहे. महापालिका शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी प्लास्टिक पिशव्यांविरोधात गांधीगिरी पध्दतीने एल्गार पुकारत रामकुंड परिसरात कापडी पिशव्यांचे वितरण केले. विक्रेते व नागरिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या संकलीत करत कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हरित कुंभ म्हणून करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगत प्लास्टिकच्या वापरावर स्वयंस्फुर्तीने बंदी आणण्याचे आवाहन केले.
महापालिका शिक्षण विभाग, हरित कुंभ समन्वय समिती आणि नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने बुधवारी चिमुकल्या गोदा पुत्रांचा हरित कुंभ तयारीसाठी जागर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिंहस्थासाठी विविध कामांनी वेग घेतला असला तरी अद्याप गोदावरीला प्रदुषणातून मुक्ती मिळालेली नाही. या संदर्भात मागील दोन ते तीन वर्षांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. न्यायालयाने प्रदूषणास हातभार लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. वेगवेगळ्या घटकांमुळे गोदावरीच्या प्रदूषणास हातभार लागत आहे. शहरात अमर्याद स्वरुपात होणारा प्लास्टिकचा वापर हे त्यापैकीच एक. प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही. त्या साचून प्रवाहात अडथळे निर्माण होतात. आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय पालिकेने आधीच घेतला आहे. सामाजिक संस्था आपापल्या पध्दतीने गोदा स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यावरण संवर्धन ही संकल्पना केवळ पाठय़पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने शिक्षण मंडळाने शालेय विद्यार्थ्यांंना या उपक्रमात सहभागी करून घेतले.
बुधवारी सकाळी रामकुंड परिसरात उपमहापौर गुरूमीत बग्गा, शिक्षण अधिकारी किरण कुंवर, गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे राजेश पंडित यांच्या उपस्थितीत या उपक्रमास सुरुवात झाली. पालिका शाळेतील एक हजाराहुन अधिक विद्यार्थी त्यात सहभागी झाले. सकाळी नऊ वाजता या विद्यार्थ्यांनी पंचवटी येथुन रामकुंड परिसरापर्यंत पर्यावरणाचा जागर करणारी फेरी काढली. रामकुंड परिसरात आल्यावर फेरीचे रुपांतर आंदोलनात झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार नाही’ अशी सामूहिक शपथही घेतली. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका हे सांगण्यासाठी गांधीगिरी पध्दतीने त्यांचे आंदोलन सुरू झाले. स्वत घरी तयार केलेल्या कागदी तसेच कापडी पिशव्या परिसरातील भाजी विक्रेते व नागरिकांना देण्यात आल्या. एक तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनात जवळपास दोन हजार कागदी तसेच कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम काय असतात, प्लास्टिकमुळे नदीचे प्रदुषण कसे होते, आरोग्यास बाधा आणण्यात प्लास्टिकची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांनी नागरीकांशी संवाद साधला.
महापालिका शाळा क्र. १०७ च्या मुख्याध्यापिका बोरसे यांनी उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. मुलांनी स्वत: प्लास्टिक मुक्त शहरासाठी पाउल उचलले आहे. यामुळे आगामी कुंभमेळ्यात शहराचा एक नवीन प्रदुषणमुक्त चेहरा येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांसमोर जाईल. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अजून काय करता येईल या संदर्भात वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा