सौर उर्जेवर आधारित सौर कार.. पवनचक्की.. ओव्हन.. इतकंच नव्हे तर ठिबक सिंचन यांसारख्या प्रकल्पाद्वारे आपल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी दाखविला.
या प्रदर्शनात इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या एकूण १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण २५ प्रकल्प या वेळी मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसरस्वती फाऊंडेशनच्या अध्यक्ष सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रदर्शनातील प्रयोगांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. प्रकल्पांविषयी त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले. शाळेने दिलेले हे उत्तम व्यासपीठ असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले. या विज्ञान प्रदर्शनात मुलांनी सौर ऊर्जा दिवसेंदिवस किती महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासह शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाशिवाय गत्यंतर नाही हे दाखविणारे प्रयोग सादर केले होते. याशिवाय पाणीबचत, जैवविविधता, वातदबाव, भविष्यातील पिढीसमोरील आव्हाने, जलसंवर्धन, आर्किमिडीज स्क्रू, प्राचीन संस्कृती, गायीच्या शेणापासून बॅटरी, फायर अलार्म असे वेगवेगळे प्रयोग मुलांनी तयार करून त्यांचे स्पष्टीकरण, उपयोग याची माहिती प्रत्येकाला देण्यात येत होती. गणितावर आधारित ‘मॅथम इंटिग्रेशन विथ क्रिकेट’ या प्रयोगाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले होते.
शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. किरण पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी मुलांच्या कौशल्याचे, सादरीकरणाचे व विचारशक्तीचे कौतुक केले.