प्रोटॉन्सखालोखाल वातावरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ‘न्युट्रिनो’ या मूलकणांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी मोठी उडी घेण्याचे ठरविले आहे. ही ‘उडी’ जमिनीखाली एक किलोमीटर एवढी खोल असणार आहे. या संशोधनामुळे पदार्थविज्ञान शास्त्र आणि अंतरिक्षज्योति वास्तवशास्त्र (अ‍ॅस्ट्रो फिजिक्स) या विज्ञानाच्या दोन शाखांमधील अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा भाभा परमाणु संशोधन केंद्राच्या केंद्रक भौतिकी विभागाचे प्रमुख व या संशोधनातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एम. दातार यांनी व्यक्त केली. न्युट्रिनोज्बद्दलचे हे संशोधन तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील पोट्टीपुरम या गावाजवळ होणार आहे. या संशोधनासाठी तामिळनाडू सरकारकडून पोट्टीपुरम येथे २६ हेक्टर आणि मदुराई येथे १३ हेक्टर जागा मिळवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
काय आहेत न्युट्रिनोज्?
न्युट्रिनोज् हे इलेक्ट्रॉन्सप्रमाणेच मूलकण आहेत. मात्र ते अणुचा भाग नाहीत. इलेक्ट्रॉन ज्याप्रमाणे विद्युतप्रभारित असतात, तसा कोणताही विद्युतप्रभार न्युट्रिनोज् वाहत नाहीत. त्यांना स्वत:चे वस्तुमानही नाही. फोटॉन्सच्या खालोखाल न्युट्रिनोज्ची संख्याच वातावरणात जास्त आहे. विश्वाच्या प्रत्येक एक घन सेंटीमीटर एवढय़ा भागात तब्बल ३०० न्युट्रिनोज् आढळतात. सूर्याकडून येणारे १०० ट्रिलियॉन एवढे न्युट्रिनो शरिराचे कोणतेही नुकसान न करता आरपार जात असतात. विशेष म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना पृथ्वीच्या आरपार जाण्याचे सामथ्र्य या न्युट्रिनोमध्ये असते. इतर मूलकणांच्या विरुद्ध न्युट्रिनोज्चा इतर कोणत्याही गोष्टीशी संपर्क येत नाही. त्यामुळेच न्युट्रिनोज् संसुचित करणे कठीण असते.
संशोधन कसे होणार?
न्युट्रिनोची ही वैशिष्टय़े लक्षात घेऊन शास्त्रज्ञ अभियंत्यांच्या मदतीने पोट्टीपुरम येथे जमिनीखाली तब्बल एक किलोमीटर खोल बोगदा खोदणार आहेत. हा बोगदा दोन किलोमीटर लांब असून दुसऱ्या टोकाला जमिनीखाली २६ मीटर रूंद, १३२ मीटर लांब आणि २६ मीटर उंच घुमटाकार प्रयोगशाळा बांधली जाईल. यात भले मोठ्ठे अभिज्ञातक (डिटेक्टर्स) बसवण्यात येतील. ५.६ सेंटीमीटर जाडीच्या लोखंडाच्या प्रत्येक लादीत ४ सेंटीमीटरची पोकळी ठेवून त्यात हे अभिज्ञातक बसवले जातील. हे अभिज्ञातक न्युट्रिनोजचे योग्य प्रमाण सांगू शकतील. यासाठी शास्त्रज्ञ अभिज्ञातकाचा नमुना तयार करून त्याचा अभ्यास करणार आहेत. तसेच संपूर्ण प्रयोग प्रक्रिया सुरू होण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागणार असून त्यासाठी तब्बल १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
उपयोग काय?
न्युट्रिनोचा अभ्यास करणे, हा या प्रयोगामागचा मुख्य उद्देश आहे. पृथ्वीवरील वातावरण व वैश्विक किरण यांच्यात होणाऱ्या प्रक्रियेतून नैसर्गिकपणे तयार होणाऱ्या न्युट्रिनोचा अभ्यास करणे या प्रयोगामुळे शक्य होईल. न्युट्रिनोज् हे सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर केवळ आठ मिनिटांत कापू शकतात. हा वेग पाहता न्यूट्रिनोजच्या माध्यमातून संपर्क क्षेत्रात काही संशोधन होऊ शकते का, याची चाचपणीही शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा