शेतकरी हवालदिल
भात बियाणाची पेरणी केल्यानंतर पावसाने तब्बल पंधरा दिवस दडी मारल्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गाईगुरांना चरण्यासाठी माळरानावर आलेले गवताचे हिरवे अंकुर करपून गेले तसेच भात बियाणे होरपळल्यामुळे पावसाच्या आगमनाकडे शेतकरी राजा आतुरतेने नजरा लावून बसला असून पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर ठाणे जिल्ह्य़ातील भात उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची चिन्हे आहेत.  
मे महिन्याच्या अखेरीस मोसमी पावसाचे ढग दिसू लागताच कोकण, ठाण्यातील शेतकरी नांगराने शेत उखळून त्यावर भात बियाणे पेरून ठेवतो. पावसाने थोडा शिडकावा दिला की लगेच हे बियाणे तरारून वर येते. भात बियाणे पेरणी ही या पट्टय़ातील अनेक वर्षांची परंपरा आहे. यावेळी जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात मोसमी पावसाला सुरुवात होताच ठाणे जिल्ह्य़ाच्या अनेक भागांत शेतक ऱ्यांनी भात पेरणी केली. त्यानंतर पावसाने सलग १५ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. वैशाख वणव्यासारखे ऊन पडत असल्याने या कालावधीत बियाणाने नाक दिलेला अंकुर करपून गेला आहे. माळरानावर पावसाच्या ओलाव्याने उगवलेले गवत होरपळून गेले.
भात बियाणाची एक गोण ५०० ते ७०० रुपयांना असते. त्यात यंदा बियाणांचा तुटवडा होता. त्यामुळे नव्याने बियाणे आणायचे कोठून या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
 वारीचे गणित
जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस पडल्यानंतर पेरलेले बियाणे पंधरा दिवसाने तयार होते. शेतकरी जूनअखेरीपर्यंत भात लावणीला सुरुवात करून पंढरीची वारी संपेपर्यंत आपली अर्धी भात लावणी पूर्ण करून पुढच्या काही दिवसांत लावणीचा हंगाम पूर्ण करायचा. हा शेतक ऱ्यांचा पिढय़ान्पिढय़ांचा गावठी ठोकताळा. आता पंढरीची वारी संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना पावसाचा पत्ता नाही आणि शेतात रोपांचा मागमूस नाही. ही गणिते समोर मांडून पारंपरिक शेतकरी यापुढे खायचे काय आणि करायचे काय या विचारात आहे.
टक निघून गेली
भात पेरणीचा एक विशिष्ट हंगाम असतो. विशिष्ट कालावधीत ठराविक भात व अन्य बियाणांची पेरणी झाली तर ती पुढील काळात तग धरतात. अन्यथा त्या पेरणीला काहीही अर्थ नसतो. रोपांची लागवड केली तर त्या लागवडीपासून दाणेदार पीक येत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. ठाणे जिल्ह्य़ात भात शेतीचा हंगाम ९० ते १४५ दिवसांचा असतो. हळवार भात पिकांमध्ये आर.२४, पीएनआर, कर्जत ३, कर्जत ४, गुजराथ ४, ही पिके १०० ते ११५ दिवसांमध्ये तयार होतात.
गरव्या पिकांमध्ये पालघर १, कर्जत २, जया, गुजराथ ११, सह्य़ाद्री, तृप्ती, सुवर्णा, मसुरी, आरपी या भात पिकांचा समावेश आहे. गरवी पिके १२५ ते १४५ दिवसांत तयार होतात. पेरणीची व लावणीची ‘टक’ निघून गेली तर पेरणी आणि लावणीच्या हंगामाला काही मजा नसते. कारण तेवढय़ा ताकदीचे भात पीक येत नाही. अनेक वर्षांनंतर प्रथमच ही दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हरिश्चंद्र काशिनाथ वरकुटे या शेतकऱ्याने सांगितले.
जनावरांचा हंबरडा
वणव्याने जळून खाक झालेले काळेकुट्ट डोंगर हिरवा शालू लपेटण्यासाठी सज्ज झाले आहेत. पावसाच्या थोडय़ाशा शिडकाव्याने डोंगरदऱ्या हिरव्यागार होण्यास सुरुवात झाली होती. पंधरा दिवस पाऊस नसल्याने डोंगरांवरील गवत करपून गेले आहे. गाईगुरांना चरण्यासाठी चारा नसल्याने त्यांना खायला घालायचे काय, असाही प्रश्न शेतक ऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पूर्वीसारखी भात शेती शेतकरी करीत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांना घरात बसून खाण्यासाठी पेंढा राहिलेला नाही. एक पेंढा ३० ते ३५ रुपयांना मिळत असल्याने वाढत्या महागाईमुळे घरात तेलासाठी हे पैसे खर्च करायचे की पेंढय़ासाठी अशा दुहेरी कचाटय़ात शेतकरी आहे.
मजुरी भिडली आकाशाला
शेतावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाला तर एक मजूर २५० ते ३०० रुपयांची मागणी करतो. सकाळी नऊ वाजता आलेला हा मजूर संध्याकाळी पाच वाजता शेतातून काढता पाय घेतो. नांगराने शेत उखळणीसाठी एका दिवसाचे ५०० ते ६०० रुपये नांगरदार घेतो. ट्रॅक्टरने शेत उखळले तर एक तासाचे ३०० ते ४००, पॉवर ट्रिलरने उखळले तर ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. या आकाशला भिडलेल्या शेतीच्या मजुरीने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. भात शेती लागवडीसाठी २० हजार रुपये खर्च केले तर त्यामध्ये पाच हजार रुपयांचे भात पीक पिकत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी दुकानातून आयता तांदूळ विकत आणून स्वत:ची भात शेती ओसाड टाकत असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्य़ात पाहण्यास मिळत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा