नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा ठाणे बेलापूर मार्गावरील मुकंद कंपनी येथे ठाण्याच्या दिशेने असणारा बस स्टॉप पदपथाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे चोरीला गेला. या संदर्भात महामुंबई वृत्तान्तमध्ये याबाबतचे १ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर परिवहन प्रशासनाने या ठिकाणी रात्रीच नवीन बस स्टॉप बसवला खरा. मात्र यातही बनवाबनवी केल्याचे समोर आले असून दिघा येथे मागील वर्षभरपासून भंगारात पडून असणारा बस स्टॉप रंगरंगोटी करून या ठिकाणी बसवण्यात आला आहे. या प्रकरणात परिवहन सभापती काय भूमिका घेणार, असा सवाल आता प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
पदपथाच्या नूतनीकरणाची मोहीम महानगरपालिकेडून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत रस्त्याच्या दुतर्फा असणारी गटारे आणि पदपथांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, पदपथाची मुकंद परिसरात ठाणे-बेलापूर मार्गावरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या पदपथाची दुरुस्ती करण्यात आली. हे काम सुरू असताना या ठिकाणी असणारा आणि मागील वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेला परिवहनचा बस थांबा काढण्यात आला होता. हा बस थांबा या ठिकाणी पुन्हा बसवणे अनिवार्य होते. मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा बस स्टॉप चोरीला गेल्याची माहिती प्रवाशांनी दिली होती. वृत्तान्तमध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित करून परिवहन प्रशासनाला जाबदेखील विचारण्यात आला होता. त्यावर परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सदरचा बस स्टॉप चोरीला गेल्याची बाब मान्य करत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे सांगितले होते. मात्र यानंतर त्या ठिकाणी गुरुवारी रात्री तातडीने नवीन बस स्टॉप बसवण्यात आला. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या बस स्टॉपची शहानिशा केली असता दिघा रामनगर येथील ओ एस प्लॉटवर भंगारात पडून असणारा जुना बस स्टॉप रंगरंगोटी करून चोरीला गेलेल्या बसस्टॉपच्या ठिकाणी बसवण्याचा प्रताप प्रशासनाने केला आहे. मात्र चोरीला गेलेला बस स्टॉप कुठे आहे, याची शहानिशा करण्याची साधी तसदीदेखील प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे प्रवाशाच्या खिशातून कररूपाने जमा झालेल्या पैशातून लाखो रुपयांची प्रशासनाकडून कशा प्रकारे उधळपट्टी केली जाते ही बाब समोर आली आहे. एनएनएमटी सध्या मोठय़ा आर्थिक तोटय़ात असून या परिस्थितीला प्रशासनाचाच हातभार असल्याचे या प्रकारावरून उघडकीस आले आहेत. परिवहन सेवेचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड गुरुवारी दंडात्मक कारवाईसाठी निघाले होते. मात्र रातोरात भंगारातील बस थांबा त्या ठिकाणी लागल्यानंतर ही कारवाई टळली. मात्र या बनवाबनवीसंदर्भात त्यांना विचारले असता याचा आढावा घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगत त्यांनी हात झटकले.
चोरीला गेलेल्या बसस्टॉपच्या जागी भंगारातील बस थांबा!
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा ठाणे बेलापूर मार्गावरील मुकंद कंपनी येथे ठाण्याच्या दिशेने असणारा बस स्टॉप पदपथाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे चोरीला गेला.
First published on: 09-01-2015 at 01:50 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scrap bus stop in place of stolen bus stop