नवी मुंबईत एमआयडीसी परिसरात अनेक उद्योजकांनी लघु व कुटीर उद्योग सुरू केले. मात्र त्यातील काही उद्योगांना घरघर लागली असून काही उद्योग बंद पडले आहेत. या बंद कंपन्यांवर भंगारमाफियांचे अतिक्रमण झाले असून या कंपन्यांच्या जागेवर या भंगारमाफियांनी अनधिकृतपणे गोदामे उभारली आहेत.
एमआयडीसीने औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी बेलापूर पट्टय़ामधील जमीन कवडीमोल भावाने भूमिपुत्रांकडून संपादित केल्या. या जमिनी दिघा, रबाले, नेरूळ, महापे या ठिकाणी एमआयडीसीने विविध कंपन्यांना विकल्या. कंपन्यांनी या ठिकाणी लघु व कुटीर उद्योग सुरू केले. मात्र त्यातील अनेक उद्योगांना आज घरघर लागली असून अनेक उद्योग ब्ांद पडले आहेत. या बंद उद्योग कंपन्यातील भंगार चोरणारे छोटे चोर आता राजकीय नेते बनवून फिरत आहे. दिघा एमआयडीसीतील बहुतेक पडीक भूखंडावर भंगारमाफियांनी कब्जा करून त्या ठिकाणी अनधिकृतपणे गोदामे उभी केली आहेत. दिघा एमआयडीसीमधील चिंचपाडा, यादवनगर या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी मोकळे भूखंड हेाते. हे भूखंड भूमिपुत्रांकडून कराराने संपादित केले आहेत. मात्र सध्या या भूखंडावर भंगार विक्रेत्यांनी लोखंड, काचा, पत्रे, प्लास्टिकची मोठी मोठी गोदामे थाटली आहेत. कुणालाही न जुमानता भंगारमाफियांचा हा व्यवसाय सुरू आहे.
या भंगार विक्रेत्यांचा मुख्यतार अन्सारी हा भंगारमाफिया पुढारी आहे. अन्सारी एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याच्यावर रबाले, रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. भंगारचोरीच्या गुन्ह्य़ात त्याला अटकदेखील करण्यात आली आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे या भंगारमाफियांवर ठोस कारवाई होत नसल्याने त्याचे धंदे जोरात सुरू आहेत, असे येथे सांगितले जाते. एमआयडीसीकडून पोलीस बंदोबस्तात या भंगार गोदामांवर कारवाई करण्यात येऊन भूखंड मोकळे करण्यात आले. परंतु एमआयडीसीची पाठ फिरताच पुन्हा अनधिकृतपणे भंगारची गोदामे उभी राहात असल्याने एमआयडीसीचे अधिकारीदेखील हतबल झाले आहेत. कारवाईवरील लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. निवडणुकीच्या काळांमध्ये भंगाराच्या गोदामांवर कारवाई थंडावल्याने भंगारमाफियांचे चांगलेच फावले आहे.
याबाबत एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश माळी यांना विचारले असता त्यांनी एमआयडीसीतील भूखंड विक्री करण्यात येणार आहेत. या भूखंडाची विक्री झाल्यानंतर या भूखंडावर झालेले अतिक्रमण हटविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.