प्रवाशांची दुहेरी कोंडी सुरूच
ठाणे परिवहन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर जागोजागी अवजड वाहनांचे अतिक्रमण झाले असतानाच परवान्यांसाठी महामार्गाच्या कडेला उभ्या रहाणाऱ्या या वाहनांच्या सोबतीला आता काही भंगार विक्रेत्यांची वाहनेही उभी राहू लागली आहेत. महामार्गास खेटूनच असलेल्या निमुळत्या अशा सेवा रस्त्यांवर भंगार विक्रेत्यांनी मोठी वाहने उभी राहू लागल्याने या मार्गावर नियमितपणे ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य ठाणेकरांची मोठी कोंडी होऊ लागली आहे. महामार्गावरून मूळ शहरात प्रवेश करायचा तर तेथे कोंडी आणि सेवा रस्ता गाठायचा तर भंगार विक्रेते वाट अडवून बसलेले, अशा दुहेरी कोंडीत तर ठाणेकर सापडले आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महामार्गालगत असलेल्या मर्फी कंपनी येथील कार्यालयातील वाहन तपासणी केंद्रे बंद केले असून वागळे, कोलशेत तसेच कशेळी भागात तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे या कार्यालयात तपासणीसाठी येणाऱ्या वाहनांच्या जागेवर म्हणजेच महामार्ग आणि सेवा रस्त्यांवर भंगार व्यावसायिक ट्रक उभे करू लागल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ठाणे येथील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या लुईसवाडी भागात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे नवे कार्यालय असून या ठिकाणी जुन्या कार्यालयापेक्षा प्रशस्त जागा आहे. त्यामुळे या कार्यालयात रिक्षा, कार, ट्रक तसेच अवजड वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तपासणीसाठी येणाऱ्या ट्रक आणि अवजड वाहनांच्या महामार्गावर दुहेरी लांबच्या लांब रांगा लागत होत्या. तसेच सेवा रस्त्यांवरही वाहने उभी करण्यात येत होती. त्यामुळे महामार्ग तसेच सेवा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र यापूर्वी पाहावयास मिळत होते. त्याचे परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही जाणवू लागल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयावर टीका होऊ लागली होती. याच पाश्र्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महिनाभरापूर्वी लुईसवाडी येथील वाहन तपासणी केंद्र बंद करून वागळे, कशेळी तसेच कोलशेत रेतीबंदर परिसरात वाहन तपासणी केंद्र सुरू केले. असे असतानाही महामार्ग तसेच सेवा रस्त्यांवर ट्रक उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संदर्भात, ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्याशी संपर्क साधला असता, वागळेमध्ये रिक्षा, कार, कशेळीमध्ये ट्रक आणि कोलशेत रेतीबंदर परिसरात ट्रेलरची तपासणी करण्यात येते. तपासणीनंतर लुईसवाडी कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काही चालक ट्रक आणतात पण, तपासणी झालेली असल्याने ट्रक आणण्याची आवश्यकता नसते. अशा ट्रकचालकांचे प्रमाणही कमी आहे, त्यामुळे पूर्वीपेक्षा आता ट्रक उभे राहण्याचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या भागातील काही भंगार व्यावसायिकही महामार्गावर ट्रक उभे करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा