मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवासाठी रस्ते, पदपथावर मंडप उभारण्यास बंदी केल्यामुळे केवळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेच नव्हे तर मूर्तिकारही अडचणीत आले आहेत.
या मंडपबंदीमुळे अनेक मूर्तिकारांना पालिकेकडून परवानगी मिळू शकलेली नाही. त्यामुळे, मूर्ती घडविण्याच्या कामातच विघ्न आले आहे. मंडपबंदीचा प्रश्न सोडविण्यावरून राजकीय पक्षांमध्ये श्रेय मिळविण्यासाठी अहमहमिका सुरू झाल्यामुळे आता विघ्नहर्त्यांनेच हे विघ्न दूर करावे, असे साकडे मूर्तिकार घालू लागले आहेत.
दरवर्षी जून-जुलै दरम्यान गिरगाव, लालबाग, परळ आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी रस्त्याच्या कोपऱ्यावर अथवा पदपथावर मंडप उभारून गणेशमूर्ती कार्यशाळा सुरू केल्या जातात. रात्र रात्र जागवून गणेशमूर्ती साकारण्याच्या कामाला वेग येतो, परंतु यंदा न्यायालयाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पदपथ अथवा रस्त्यांवर मंडप उभारण्यास बंदी घातली आहे. त्याचा फटका मूर्तिकारांनाही बसला आहे.
अनेक मूर्तिकारांनी मंडप उभारणीसाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे पालिकेने मूर्तिकारांना परवानगी दिलेली नाही. गणेशोत्सव जवळ येत असताना जागेअभावी गणेशमूर्ती कशा घडवायच्या, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. पालिकेने वेळीच परवानगी दिली असती तर मूर्ती घडविण्याचे काम एव्हाना सुरू झाले असते. सध्या कडक ऊन पडत आहे. त्यामुळे मूर्ती झटपट सुकल्या असत्या. जुलै निम्मा ओसरला तरी परवानगी मिळण्याची चिन्हे नाहीत. तर मग मूर्ती साकारणार कधी आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर त्या सुकणार कधी, असे अनेक प्रश्न मूर्तिकारांना भेडसावत आहेत.
गेल्या वर्षी पालिकेने सुमारे १५० मूर्तिकारांना रस्ते आणि पदपथावर मंडप उभारण्यासाठी परवानगी दिली होती, परंतु यंदा आतापर्यंत एकाही मंडपाला परवानगी मिळू शकलेली नाही.
मूर्तिकारांच्या प्रश्नाकडे
सर्वाचेच दुर्लक्ष
उच्च न्यायालयाने घातलेल्या मंडपबंदीबाबत सध्या भाजप आणि शिवसेनेचे नेते एकामागून एक बैठका घेऊन चर्चा करीत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा देण्याची आश्वासने दोन्ही पक्षांकडून दिली जात आहेत. आगमन आणि विसर्जन निर्विघ्नपणे पार पडेल, असा दिलासाही दिला जात आहे. पण आगमनकर्ता श्रीगणेश घडविणाऱ्या मूर्तिकारांच्या प्रश्नाकडे कुणाचेच लक्ष नाही. पालिकेने मंडपांना परवानगी दिली नाही, तर मूर्तिकार गणेशमूर्ती साकारणार तरी कधी? आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगीच मिळालेली नाही. आगमनकर्त्यां गणरायाची मूर्तीच नसेल तर गणेशोत्सव तरी कसा साजरा करणार?
– गजानन तोंडवळकर,
अध्यक्ष, बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ
अटी-शर्तीची पूर्तता नाही
न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी मंडप उभारणीसाठी काही मूर्तिकारांनी अर्ज केले होते. त्यापैकी काहींना पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही मूर्तिकारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची, तसेच अटी-शर्थीची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
– आनंद वाघराळकर,
उपायुक्त, मुंबई महानगरपालिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा