प्रदूषणात भर घालणारे कोळसा डेपो इतरत्र स्थानांतरित करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी सलग तीन नोटीस बजावल्यानंतरही त्याची दखल न घेता मुजोरीने वागणाऱ्या कोळसा व्यावसायिकांच्या डेपोला सील ठोकण्यासाठी तहसीलदार गणेश शिंदे आज पोलीस ताफ्यासह पोहोचताच खळबळ उडाली. कोटय़वधीच्या कोळशासह डेपोला सील लागणार हे बघताच व्यावसायिकांनी जास्तीचे ट्रक लावून कोळसा हलविण्यास सुरुवात केली असून या कारवाईने कोळसा व्यापारी चांगलेच हादरले आहेत.
चंद्रपूर-नागपूर मार्गावर पडोली व लखमापूर येथे मोठय़ा प्रमाणात कोळसा डेपो आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषणात भर पडत असून इरई नदीचे पात्र काळवंडले असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. याच अहवालाचा आधार घेत तत्कालीन जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी वष्रेभरापूर्वी ३६ डेपोला सील ठोकले होते. त्यानंतर कोळसा व्यापाऱ्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडून एमआयडीसीत डेपोसाठी जागाही पदरी पाडून घेतली.
काही डेपो पडोली व लखमापूर येथून प्रस्तावित जागेवर स्थलांतरित झाले. मात्र तरीही १५ कोल डेपो लखमापूर येथे आजही आहेतच. हेही डेपो तात्काळ हलविण्यात यावे, या आशयाची पहिली नोटीस उपविभागीय अधिकारी आशूतोष सलिल यांनी ३१ जुलै २०१३ रोजी देवसाना अग्रवाल, रामविलास मित्तल, ज्ञानेश्वर आवारी, हाजी रफीक मारखानी, महेश शर्मा, राजू जितेंद्रकुमार जैन, धनपाल अग्रवाल, बजरंग अग्रवाल, जितेंद्र सिंग, विजय जैन, चक्रेश जैन, मुकेश भट्टड, बंडू वायगोडे, कैलास अग्रवाल, पृथ्वीराज शर्मा या १५ कोळसा व्यापाऱ्यांना दिली.
पहिलीच नोटीस असल्याने व्यापाऱ्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१३ रोजी दुसरी नोटीस बजावतांना १५ दिवसात डेपो हलविले नाही, तर सील ठोकण्याची कारवाई करू, असे म्हटले. त्याकडेही गांभीर्याने बघितले गेले नाही. २१ डिसेंबर २०१३ रोजी तिसरी नोटीस दिली. तरीही कोळसा व्यापारी शांत बसले होते. याउलट कोळसा व्यापारी मुजोरी करत असल्याचे बघून आज तहसीलदार गणेश शिंदे लखमापूर येथे पोलीस ताफा व पथकासह दाखल झाले आणि थेट सील ठोकण्याची कारवाई सुरू केली. हे बघून कोळसा व्यापारी हादरले. त्यानंतर सर्व कोळसा व्यापाऱ्यांनी एकत्र येत तहसीलदार शिंदे यांची भेट घेऊन आम्हाला दोन दिवसाचा अवधी द्या, डेपो इतरत्र हलवितो, अशी विनंती केली. त्यावर तहसीलदारांनी आतापासून कोळसा हलविण्यास सुरुवात करत असाल तरच वेळ देतो अन्यथा, कारवाई करून कोटय़वधीचा कोळसा जप्त करतो, असा इशारा दिला. तहसीलदारांची कडक भूमिका बघता १५ कोळसा व्यापाऱ्यांनी अतिरिक्त ट्रक लावून कोळसा उचलण्यास सुरुवात केली.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत डेपो इतरत्र हलविण्यात आले नाही तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सध्या तरी या सर्व व्यावसायिकांनी कोळसा हलविण्यास सुरुवात केली आहे. कारवाईच्या भीतीने मुजोर कोळसाा व्यापारी वठणीवर आले आहेत.
कोळसा डेपो सील करण्याच्या कारवाईने व्यावसायिक हादरले
प्रदूषणात भर घालणारे कोळसा डेपो इतरत्र स्थानांतरित करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी सलग तीन नोटीस बजावल्यानंतरही त्याची दखल
First published on: 24-01-2014 at 08:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seal to coal depot shook up businessmans