रेल्वेच्या धडकेने स्वत:चे पिल्लू गमावून बसलेली वाघीण व तिचे सव्वा वर्षांचे पिल्लू रविवारी रात्रीपासून बेपत्ता असून वनखात्याने या दोघांच्या शोधासाठी केळझर परिसरात दहा पथकाच्या माध्यमातून ‘सर्चिग ऑपरेशन’ सुरू केले आहे, तर या अपघाताच्या चौकशीसाठी रेल्वे चालकाला बोलावण्यात आले आहे.
 गोंदिया-चंद्रपूर या चांदा फोर्ट रेल्वेच्या धडकेने रविवारी रात्री वाघिणीच्या सव्वा वर्षांच्या पिल्लाचा मृत्यू झाला, तर अन्य एक पिल्लू गंभीर जखमी झाले. या दुर्देवी घटनेनंतर पट्टेदार वाघीण व तिचे सव्वा वर्षांचे पिल्लू बेपत्ता झाले आहे. या दोघांचा शोध घेण्यासाठी वनखात्याचे ५० बिट गार्ड, वनमजूर, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी केळझर, मूल, सिंदेवाही व ताडोबाच्या पट्टय़ात तिचा शोध घेत आहेत. रेल्वेलाईनच्या अगदी जवळच्या झुडपी जंगलात जखमी बछडा मिळाल्याने वाघीण व तिच्या सोबतचा बछडाही तेथेच असावा, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज होता. त्याच आधारावर आजूबाजूच्या परिसरात वाघिणीचा शोध घेण्यात आला, मात्र केळझर व मूलपर्यंत ही वाघीण कुणालाही दिसलेली नाही. त्याचा परिणाम आता काल सोमवारी सकाळपासून ‘सर्चिग ऑपरेशन’ सुरू करण्यात आले आहे. वनविकास महामंडळ व परिसरातील जंगलातील प्रत्येक पाणवठय़ांवर दोन वन कर्मचारी उभे करण्यात आले आहेत, तसेच रेल्वेलाईन ज्या भागातून जाते त्या मार्गानेही वाघिणीचा शोध घेण्यात आला, वाघीण ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या परिसरात व सिंदेवाही व नागभिडच्या जंगलात सुध्दा तिचा शोध घेतला जात आहे. या परिसरातील प्रत्येक गावात दवंडी पिटवून वाघीण दिसली असेल तर वनखात्याला कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहायक उपवनसंरक्षक कुळसंगे यांच्याशी संपर्क साधला असता वाघिणीचा शोध युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली, मात्र सध्यातरी वाघीण बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. लोक वाघीण दिसली, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात वन कर्मचारी किंवा वन पथकातील एकालाही ती दिसलेली नाही, असेही ते म्हणाले. दुसरीकडे या संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेण्यासाठी रेल्वे चालकाला सुध्दा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  जखमी बछाडय़ावर नागपुरात उपचार सुरू आहेत. त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, येत्या महिन्याभरात तो चालायला लागेल, अशी माहिती प्राथमिक उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर यांनी दिली.

Story img Loader