मध्यप्रदेशातील खंडवा येथील तुरुंगातून पळालेल्या सहा दहशतवाद्यांपकी काही जण मराठवाडा व विदर्भात आश्रयासाठी आल्याची शक्यता गृहीत धरून दहशतवाद विरोधी पथकाने शोध मोहीम गतिमान केली आहे. पसार झालेल्या सहा पकी झाकीर हुसन हा नांदेडचा ‘जावई’ आहे.
 मध्यप्रदेशातल्या खंडवा येथील जिल्हा कारागृह फोडून सहा सिमीचे कुख्यात दहशतवादी पळाले होते. २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबाद येथे या सहा जणांचा साथीदार अजहर कुरेशी याला एटीएसने कंठस्नान घातले होते. या सहा जणांचे पूर्वी काही काळ मराठवाडय़ात तसेच अमरावती, भुसावळ, जळगाव भागात वास्तव्य होते. झाकीर हुसेन, महंमद एजाजोद्दीन, अबु फैजल, महंमद अस्लम, अमजद खान व महेबूब मलीक यांनी तुरुंगातून पळ काढल्याने मध्यप्रदेश पोलिसांसह राज्यातील दहशतवाद विरोधी पथकही कमालीचे चक्रावले होते. मध्यप्रदेशातून पळालेले हे सहाही जण मराठवाडा किंवा विदर्भात वास्तव्यास येण्याची शक्यता गृहीत धरून एटीएसने आपल्या हालचाली अधिक गतिमान केल्या आहेत. एटीएसच्या नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड येथील शाखेने आपापल्या कार्यक्षेत्रात काही जणांची चौकशी सुरू केली. या सहा जणांचे पूर्वीचे वास्तव्य, वेगवेगळ्या भागातील तरुणांशी असलेला संपर्क व नातेवाईकांचे वास्तव्य या पाश्र्वभूमीवर एटीएसने आता तपास केंद्रित केला आहे. हे सहाही जण एटीएसकडे असलेल्या नोंदीनुसार खतरनाक अतिरेकी आहेत. मध्यप्रदेशातून मराठवाडा, विदर्भात येण्यासाठी कनेक्टीव्हीटी मोठय़ा प्रमाणावर आहे. विदर्भमाग्रे किंवा जळगावमाग्रे हे पूर्वी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी येण्याची शक्यता गृहीत धरून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या-ज्या जिल्ह्यात एटीएसच्या शाखा आहेत. तेथे शहरातील हॉटेल्स, रेल्वेस्थानक, लॉज, संवेदनशील ठिकाणाची झाडाझडती सुरू आहे. काही अधिकारी जळगावात तर काही अधिकारी अमरावती नागपूर भागात तळ ठोकून आहेत. या सहापकी झाकीर हुसेन याची सासुरवाडी नांदेड आहे. नांदेडला त्याचे येणे जाणे फारसे नसले तरी स्थानिक एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने ‘खबरे’ नेमले आहेत. मराठवाडा किंवा विदर्भात ते आले असतील तर ते कुठल्याही परिस्थितीत पकडले जावेत, या दृष्टीने व्यूव्हरचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नांदेड, बीड, औरंगाबाद हे जिल्हे एकेकाळी सिमीचे केंद्र होते. सिमीवर बंदी घातल्यानंतर या संघटनेचे काही जण अन्य संघटनांच्या नावाखाली कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. या सर्व पाश्र्वभूमीवर एटीएसने आपला तपास गतिमान केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या सहा जणांनी अजहर कुरेशी याला कंठस्नान घालणाऱ्या एटीएसचे पोलीस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी व पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

Story img Loader