जैव-तंत्रज्ञानाचा वापर करून जैविक-अजैविक ताण सहन करू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण कराव्यात. शाश्वत कृषी विकासासाठी हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीच्या संशोधनावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी संशोधन परिषदेच्या बैठकीत कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांनी केले.
डॉ. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. परिषदेचे सदस्य भारती अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दुर्ग (छत्तीसगड) येथील प्राचार्य डॉ. डी. के. दास, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाचे प्रकल्प सल्लागार डॉ. बी. बी. गुंजाळ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. आर. एस. पाटील, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे विभागीय सहआयुक्त मोईउद्दीन, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. गोरे म्हणाले की, खासगी संस्थेसोबत करार करून त्यांचा सहभाग कृषी संशोधनात व विस्तार कार्यात घ्यावा, विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी विशेष प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधन कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. गुंजाळ म्हणाले की, या भागास अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीचे आवाहन शास्त्रज्ञांनी स्वीकारले पाहिजे. मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास व्हावा. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्व विभागांनी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. दास म्हणाले की, मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसमोर एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. संशोधक संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे यांनी विद्यापीठाच्या मागील वर्षीच्या संशोधन कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ. ए. एस. कारले यांनी केले.

Story img Loader