मुंबईत हरवलेल्या तब्बल १५ हजार जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष कक्ष असला तरी हरविलेल्या व्यक्ती क्वचितच सापडतात. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून हरविलेल्या व्यक्तींचा विशेषत: अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्याचे त्यांनी ठरविले आहे. या नव्या पद्धतीमुळे हरविलेली मुले सापडणे शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांना वाटत आहे.
मुंबई पोलिसांच्या विशेष कक्षात दररोज पाच ते सहा जण हरविल्याची नोंद आढळते. दूरदर्शनवरील ‘लापता’ या सदरात छायाचित्र आणि माहिती प्रसिद्ध करणे तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांना तपशील पाठविणे इतकेच या कक्षाचे काम मर्यादित आहे. हरविलेल्या व्यक्तीची माहिती मिळालीच तर त्या दिशेने पाठपुरावा करणे असे या कक्षाचे काम आहे. मात्र, प्रत्यक्षात हरविलेल्या व्यक्ती सापडण्याचे प्रमाण कमी आहे. हरविलेल्या व्यक्तींचा पोलिसांनी शोध घेतल्याचे उदाहरण सापडलेले नाही. हरविलेल्या व्यक्तींचा शोध लागणे आवश्यक आहे. त्यात काही प्रमाणात जरी आम्ही यशस्वी झालो तरी संबंधित कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. त्यासाठीच हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी काय करता येईल, याची चाचपणी मारिया यांनी सुरू केली आहे.
अल्पवयीन मुलांना पळवून नेऊन मंदिर वा वाहतूक सिग्नलवर वा अन्य ठिकाणी भीक मागण्यास भाग पाडणाऱ्या टोळ्या आहेत. परराज्यांतून मुले पळवून आणून मुंबई वा आसपासच्या परिसरात भीक मागण्यासही सांगितले जाते. अशा वेळी मुंबईत भीकमागणाऱ्या वा बेघर असलेल्या मुलांना सीसीटीव्हीच्या जाळ्यात पकडून त्यांची छायाचित्रे हरविलेल्या मुलांची मिळतीजुळती आहेत का, हे पाहिले जाणार आहे. या पद्धतीमुळे हरविलेल्या काही मुलांचा शोध लागू शकेल, असा विश्वास पोलिसांना वाटत आहे. अशीच पद्धत राज्य पातळीवरही राबविली तर कदाचित हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात गती येऊ शकेल, असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ही पद्धत सुरू केली जाणार आहे. या पद्धतीला यश मिळाल्यानंतर व्यापक प्रमाणात ही पद्धत राबविली जाणार असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.
ही पद्धत कितपत यशस्वी होते याबाबत आताच काही सांगता येणे शक्य नाही. मात्र, हातावर हात ठेवून गप्प बसण्यापेक्षा हरविलेल्या व्यक्तींचा विशेषत: अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेणे, याला आपला अग्रक्रम आहे.
राकेश मारिया, पोलीस आयुक्त