मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सदस्यपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १६ नगरसेवकांची मते फुटल्याने खडबडून जागे झालेल्या पक्षश्रेष्ठींनी यासंबंधीचा सविस्तर अहवाल स्थानिक नेत्यांकडून मागविला आहे. अवघ्या ६० मतांच्या जोरावर या निवडणुकीत आपल्या पक्षाचे दोन सदस्य निवडून आणणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विकास आघाडीकडे या मतांची रसद वळविली गेली का, याचा शोधही सुरू झाला आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या एमएमआरडीए निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ठाणे जिल्हय़ातील तब्बल १६ नगरसेवकांची मते फुटल्याने या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसंबंधीचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी ठाण्यातील नेत्यांना दिले आहेत. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीची सात मते फुटल्याची तक्रार या निवडणुकीतील पक्षाचे ठाण्यातील उमेदवार सुहास देसाई यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. नेमकी कुणाची मते फुटली याचा शोध ठाण्यातील नेत्यांनी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. एमएमआरडीए सदस्य पदाच्या निवडणुकीत ठाणे महापालिकेतून राष्ट्रवादीचे सुहास देसाई जेमतेम ३१ मते मिळवून निवडून आले. त्यांच्यासाठी पक्षाने ३९ मते राखीव ठेवली होती. त्यापैकी एक मत बाद झाले तर सात मते फुटली. उल्हासनगर महापालिकेतील दुलाई या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेलाही मतफुटीमुळे पराभव पत्करावा लागला. या भागातील भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी भिवंडी महापालिकेतील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक गळाला लावून पप्पू कलानी यांना धक्का दिल्याची चर्चा आता रंगली आहे. भिवंडी, नवी मुंबईतील पक्षाची काही मते फुटल्याची तक्रार उल्हासनगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करणाऱ्या ठाण्यातील पक्षाच्या नेत्यांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या मतफुटीची दखल राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी घेतली आहे.
तसेच याच मुद्दय़ावरून ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची कानउघाडणीही केल्याचे सूत्रांकडून समजते. या निवडणुकीत कोणाचे मत बाद झाले आणि ती फुटलेली सात मते कुणाची यासंबंधीचा अहवालही देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठाण्यातील नेत्यांनी निवडणुकीचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. या वृत्ताला महापालिकेतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक व विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे यांनी दुजोरा दिला आहे.

Story img Loader