नवरा-बायको एकमेकांना शोभत नाहीत, केवळ या कारणासाठी घटस्फोट देण्याची तरतूद हिंदू विवाह कायद्यात नाही. या एका अडचणीमुळे अनेक जोडपी वर्षांनुवर्षे एकत्र राहतात. मात्र रोजच्या कटकटीमुळे त्यांच्या मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो.. अशा अनेक समस्यांवर ‘श्यामचे वडील’ हा चित्रपट खूप चांगले भाष्य करतो..
सध्याच्या पिढीपुढे घटस्फोट ही समस्या आऽऽ वासून उभी आहे. गेल्या काही वर्षांत नवविवाहित दाम्पत्याच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. ही जोडपी या घटस्फोटांमागे अनेक कारणे देत असली, तरी मुख्य कारण म्हणजे एकमेकांशी जमत नाही. त्यात गेल्या पिढीत स्त्रिया कमावत्या झाल्यानंतर आताच्या पिढीत अनेक घरांत स्त्रीच घराचा खर्च सांभाळताना दिसते, तर पुरुष घराची जबाबदारी उचलताना दिसतात. स्त्रियांची मानसिकता प्रचंड बदलली असून त्या आता खूपच ‘प्रोफेशनल’ झाल्या आहेत. आताच्या काळात हे समजण्यासारखं आहे. पण २५ वर्षांपूर्वी ही परिस्थिती एखाद्या कुटुंबात आली असती तर? या ‘तर’ची उकल करत आणि त्या ‘तर’मुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांवर भाष्य करत ‘श्यामचे वडील’ हा चित्रपट डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतो.
माधव देशपांडे (तुषार दळवी) आणि लीना देशपांडे (सुरेखा तळवलकर) हे जोडपं गेली २५ वर्षे संसार करत आहे. त्यांचा मुलगा श्याम देशपांडे (चिन्मय उदगीरकर), हा मनाने वडिलांच्या जवळ आहे. लीना ही अतिशय मानी, किंबहुना अहंकारी, कुटुंबातील कमावती स्त्री आहे. तर माधव, व्यवसायात खोट आल्याने छोटीमोठी कामे करून मुलाचाही सांभाळ करतो. लीनाच्या अहंकारी स्वभावामुळे श्याम लहान असल्यापासून माधव आणि लीना यांच्यात खटके उडत आहेत. मोठय़ा श्यामला आपल्या आईकडून सतत होणाऱ्या आपल्या वडिलांचा अपमान सहन होत नाही. आपल्या वडिलांनी आपल्या आईपासून घटस्फोट घ्यावा, असं त्याला मनापासून वाटतंय. पण वडिलांना आईवर कोणतेही आरोप करायचे नाहीत, हे लक्षात आल्यानंतर तो वेगळीच शक्कल लढवतो. त्यासाठी त्याला वकील असलेली त्याची आत्या (रिमा लागू) मदत करते. न्यायालयात जनहित याचिका दाखल करून श्याम आपल्या आई-वडिलांची केस निकालात काढतो. म्हणजे नक्की काय होते, माधव आणि लीनाचा घटस्फोट होतो का, त्यामुळे पुढे काय होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि स्वत:च्या आयुष्यातही एक मोठा धडा घेण्यासाठी ‘श्यामचे वडील’ हा चित्रपट पाहणे गरजेचेच आहे.
चित्रपटाची सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे या चित्रपटाचे कथानक! चित्रपटाचे कथानक प्रचंड सशक्त आहे. हे कथानक प्रेक्षकाला विचार करायला लावतं, त्याला खिळवून ठेवतं आणि अस्वस्थ करतं. श्यामची जडणघडण, त्यात असलेला त्याच्या वडिलांचा वाटा, माधवची कुचंबणा, लीनाचा हेकेखोर आणि संतापी स्वभाव सर्वच उत्तम रेखाटलं गेलं आहे. असे अनेक श्याम, लीना, माधव आपल्या आजूबाजूला वावरत असल्याने ते आपलेसे वाटतात. फक्त काही गोष्टी खटकतात. वडिलांना घटस्फोट मिळावा, यासाठी आपल्या आत्याकडेच मदत मागायला गेलेल्या श्यामची समजूत आत्याने काढणे सयुक्तिक होते. मात्र तसं दाखवलेलं नाही. त्याचप्रमाणे खटल्याचा निकाल लागण्याच्या आदल्या संध्याकाळी माधव श्यामला झापतो आणि लीनाने श्यामसाठी काय काय त्याग केला आहे, हे ऐकवतो. वास्तविक ही कानउघाडणी सुरुवातीलाच असायला हवी होती. त्याचप्रमाणे लीनाचे आई-वडील केवळ तोंडी लावण्यासाठी चित्रपटात घेतल्यासारखे वाटतात.
त्याचबरोबर चित्रपटात संगीत, प्रकाशयोजना आणि कॅमेरा भाव खाऊन जातो. श्याम हा रॉक बँड आर्टिस्ट असल्याने संगीताला प्रचंडच वाव आहे आणि सोहम, निखिल आणि आदित्य यांनी त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. ही गाणी आधुनिक मराठी संगीतात चांगलीच गाजतील. रॉक किंवा रॅप प्रकार मराठीत फार प्रसिद्ध नाही. पण या चित्रपटातील सर्व गाणी चांगलीच जमली आहेत. ही सर्व गाणी एका बँडमध्ये सादर होत असल्याने त्यांची प्रकाशयोजना अत्यंत योग्य आणि भडक झाली आहे. छायाचित्रणकार सँडी यांनीही काही फ्रेम्स अत्यंत कलात्मकपणे निवडल्या आहेत. फक्त काही ठिकाणी क्लोजअप्स जास्तच टाइट झाले आहेत.
या चित्रपटाची अभिनयाची बाजूही सशक्त आहे. तुषार दळवी यांना बऱ्याच काळाने मोठय़ा पडद्यावर अनुभवणे खरंच खूप सुखद आहे. त्यांनी माधवची भूमिका खूपच चांगली साकारली आहे. हताश, कणखर, नीतिमूल्यांची जपणूक करणाऱ्या माधवच्या भूमिकेत तुषार दळवी चांगलाच दिसतो. सुरेखा तळवलकर यांची लीनाही चांगलीच जमली आहे. चित्रपट पाहताना या बाईचा राग येतो, एवढा चांगला अभिनय त्यांनी केला आहे. रिमा, विनय आपटे, विद्याधर जोशी आणि डॉ. मोहन आगाशे यांनीही त्यांच्या वकुबाला साजेशीच कामं केली आहेत. पण सर्वात जास्त कौतुक आहे ते पहिल्यांदाच चित्रपटात काम करणाऱ्या चिन्मय उदगीरकर याचं. त्याने अत्यंत प्रगल्भ अभिनयाने श्याम साकारला आहे. त्याची घुसमट, ती व्यक्त करण्यासाठी संगीताचा वापर, अस्वस्थ असताना बेसूर गाणं, आईची बाजू ऐकल्यानंतर त्याचं कासावीस होणं हे सगळंच चिन्मयने खूपच ताकदीने उभं केलं आहे.
४५९ एण्टरटेन्मेण्ट प्रस्तुत श्यामचे वडील – एक पर्व
निर्माता – अजय पाठक, दिग्दर्शक – आर. विराज
संगीत – सोहम, आदित्य व निखिल, छायाचित्रण – सँडी
कलाकार – तुषार दळवी, सुरेखा तळवलकर, डॉ. मोहन आगाशे, रिमा, विनय आपटे, विद्याधर जोशी, स्मिता तळवलकर, शेखर नवरे आणि चिन्मय उदगीरकर.
rohan.tillu@expressindia.com
अस्वस्थ करणारे ‘पर्व’
नवरा-बायको एकमेकांना शोभत नाहीत, केवळ या कारणासाठी घटस्फोट देण्याची तरतूद हिंदू विवाह कायद्यात नाही. या एका अडचणीमुळे अनेक जोडपी वर्षांनुवर्षे एकत्र राहतात. मात्र रोजच्या कटकटीमुळे त्यांच्या मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो.. अशा अनेक समस्यांवर ‘श्यामचे वडील’ हा चित्रपट खूप चांगले भाष्य करतो..
आणखी वाचा
First published on: 16-12-2012 at 12:26 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Season that makes uncomfortable