स्थानिक स्वराज्य संस्था करप्रणालीच्या (एलबीटी) विरोधात पुकारण्यात आलेल्या ४८ तासांच्या ‘व्यापार बंद’ ला सोलापुरात काल पहिल्या दिवसाच्या तुलनेने मंगळवारी दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे कोटय़वधींची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले.
काल सोमवारी ‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र या तुलनेने मंगळवारी दुसऱ्या दिवशी बहुसंख्य व्यापारी संघटनांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घेत एकजुटीचे दर्शन घडविले. नवी पेठेसारख्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत पहिल्या दिवशी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी या भागात बहुसंख्य दुकानपेढय़ा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नेहमी वर्दळीने गजबजलेल्या या भागात शुकशुकाट दिसून आला. विशेषत: दुपारच्या रणरणत्या उन्हामुळे या परिसरात अघोषित संचारबंदीसारखे दृश्य पाहावयास मिळाले.
नवी पेठेप्रमाणेच सराफ बाजार, मधला मारुती, फलटण गल्ली, चाटी गल्ली, टिळक चौक, लोखंड गल्ली, कुंभार वेस, बाळीवेस, अशोक चौक, साखर पेठ, बेगम पेठ, गणेश पेठ, मेकॅनिक चौक, कोंतम चौक, माणिक चौक आदी भागात ‘बंद’ चा परिणाम बऱ्यापैकी जाणवला. रेडिमेड कापड उत्पादकांसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रेत्यांनी बंदमध्ये दुसऱ्या दिवशी सहभाग घेतला.  सोलापूर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर वनकुद्रे यांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे.

Story img Loader