उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत चितळे समितीचा अहवाल आल्यानंतर सिंचन घोटाळ्याचा पुढचा अंक जनतेसमोर मांडला जाईल. केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे षड्यंत्र सरकारने आखले असून, लोकप्रतिनिधींना कारवाईच्या बाहेर ठेवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक विजय पांढरे यांनी केला. शहरातील तुळजाभवानी पुजारी मंडळ सभागृहात रविवारी आयोजित आम आदमी पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामजीवन बोंदर होते.
यावेळी  पांढरे म्हणाले की,  सत्ताधारी गेल्या ६० वर्षांपासून सत्तेच्या माध्यमातून मिळविलेल्या पशांतून पुन्हा सत्ता हस्तगत करीत आहेत.  या सरकारचे आणि भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचे सत्तेबाहेर जाण्याचे दिवस सुरू झाले आहेत. आम आदमी पार्टीने देशात सामान्य माणसाची ताकद दाखवून दिली आहे. दिल्लीप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीत सामान्य माणसाला निवडून येण्याची संधी मिळणार आहे. या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्रात या पक्षाची ताकद संघटित करण्याच्या उद्देशानेच हा दौरा असल्याचे ते म्हणाले.
विद्यमान आमदार, खासदार व मंत्री हे सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या विकास योजना तयार करीत आहेत. येत्या कालखंडात तो पसा खर्च करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी सुरू आहे. त्यात कोटय़वधी रुपये कमिशन व भ्रष्टाचार करून आपले नातेवाईक व कार्यकत्रे पोसण्यासाठी ते कामाला लागले आहेत, असे पांढरे म्हणाले.
उस्मानाबाद जिल्ह्यात झालेला विकास हा रचनात्मक विकास नसून केवळ मातीकाम करून सिंचनात लाखो रुपयांची लुटमार केली असल्याची टीका त्यांनी केली. सत्ताधाऱ्यांची दहशत असल्यामुळे आम आदमी पार्टीकडे आजच्या स्थितीत मनुष्यबळाची कमतरता असली तरी, येत्या दोन महिन्यांत जिल्ह्य़ात पक्षाची ताकद दिसून येईल.
मराठवाडय़ातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडय़ातील जनतेने सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता, स्वतच्या खर्चाने पोकलॅन मशिनद्वारे शिरपूर पॅटर्ननुसार पाण्याचे डोह निर्माण करावेत व पडणाऱ्या पावसापकी ८० टक्के पाणी भूगर्भात साठवावे,असेही ते म्हणाले. मागील ४० वर्षांत सिंचनाच्या कामासाठी केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूमुळेच हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प उभे करण्यात आले. अद्याप ते अपूर्ण आहेत. भविष्यात ते पूर्ण होण्यासाठी सरकारचे कोणतेही नियोजन नाही. म्हणून मराठवाडय़ात चार हजार पोकलॅन लावून पाण्याचे डोह करणे हाच एकमेव उपाय आहे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. महादेव पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा