शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी स्थानिक शिवसैनिकांनी सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी महाआरती, दुग्धाभिषेकाद्वारे त्यांना दिर्घायू लाभावे म्हणून देवाला साकडे घातले. बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम मिळावा याकरिता मनसेचे आ. उत्तम ढिकले व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरात प्रार्थना केली. बाळासाहेबांच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होत असल्याचे दुपारनंतर वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येऊ लागल्यानंतर शिवसैनिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, नाशिकमधील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मुंबईला रवाना झाले असून मनसेच्या आमदारांनी मातोश्रीला भेट देऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धुळे व जळगाव येथेही मंदिरांमध्ये शिवसैनिकांकडून प्रार्थना करण्यात आली.
बाळासाहेबांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती बुधवारी रात्री वाहिन्यांवरून दिली गेल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची मातोश्रीवर रिघ लागल्याने स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी महाआरती, पूजा, अभिषेकाच्या माध्यमातून देवाला साकडे घातले. सोमेश्वर मंदिरात नगरसेवक विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी गुरूवारी दुग्धाभिषेक करत बाळासाहेबांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली होती. शुक्रवारी दुपारी एक वाजता पंचवटी भागातील स्थानिक कार्यकर्त्यांनी मनसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिरात सामुहिक प्रार्थना केली. मनसेचे आ. उत्तम ढिकले व शिवसेनेचे गुलाब भोये याप्रसंगी उपस्थित होते. ग्रामीण भागातही स्थानिक शिवसैनिकांच्यावतीने  सामुहिक प्रार्थनेचे सत्र सुरूच होते. यावेळी शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. दिवसभर शिवसैनिकांसह सर्वसामान्यांचे डोळेही दुरचित्रवाणीवरील बातम्यांकडे लागले होते. ज्यांना या बातम्या पाहणे शक्य नव्हते ते आपल्या आप्तमित्रांकडून त्याबद्दल माहिती घेत होते. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या उभारणीत पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी बाळासाहेबांविषयीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
दुसरीकडे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शालिमार चौकातील शिवसेना कार्यालय परिसरात तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त शुक्रवारीही कायम होता. कार्यालयात काही शिवसैनिक वगळता फारसे कोणी उपस्थित नव्हते. आ. बबन घोलप, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी सकाळीच मुंबईला रवाना झाले. मनसेचे आ. वसंत गिते आणि आ. नितीन भोसले यांनीही मातोश्रीवर जावून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमधील परिस्थितीही काही वेगळी नव्हती. धुळे शहरात शिवसेना तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यात आली. शिवसेनेचे आ. प्रा. शरद पाटील हे गुरूवारपासून मातोश्री परिसरात तळ ठोकून आहेत. 

Story img Loader