सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान नेरूळ येथे दुसरे संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून यावेळी वारकरी सेवा पुरस्कार व वारकरी विठ्ठल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक व अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री गणेश नाईक हे राहणार असून समन्वयक भजनसम्राट महादेवबुवा शहाबाजकर आहेत.
या संमेलनात संत साहित्य आणि शेती, संत साहित्य आणि स्त्री शक्ती, संत साहित्य आणि चित्रपट, संत साहित्य आणि कायदा या विषयावर भजन व कीर्तन होणार आहेत.
नेरूळ येथील रामलीला मैदानात होणाऱ्या या संमेलनात आमदार तात्यासाहेब डिंगरे यांना वारकरी सेवा पुरस्कार तर केशवराव कबीर बुवा लोंढे यांना वारकरी विठ्ठल पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader