क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत मरण पावलेल्या एका गरीब, मागासवर्गीय महिलेच्या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल न करता सोडून दिल्यामुळे काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एका जिल्हाध्यक्षाने फेसबूकवर मानलेले जाहीर आभार आता पोलिसांनाच अडचणीचे ठरणार आहेत. उपायुक्त लख्मी गौतम आणि वरिष्ठ निरीक्षक भीमदेव राठोड यांची नावे घेऊनच हे आभार नाटय़ पार पडले आहे. ‘आम आदमी पार्टी’ने हे प्रकरण उचलून धरले असून सदर मृत महिलेला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
चेंबूर येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या कोयरी कुटुंबीयाचा कुत्रा २६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल मिश्रा यांच्या बहिणीला चावला. त्यामुळे मिश्रा यांच्यासह त्यांची आई चांदणी मिश्रा अन्य तीन जण तेथे आले आणि त्यांनी देवीप्रसाद कोयरी यांच्यासह पत्नी मंजू आणि मुलगी निशा यांना मारहाण केली. त्याचवेळी मंजू खाली कोसळली. तिला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. न्याय-वैद्यक प्रकरण असल्यामुळे सायन रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. याच काळात पोलीस ठाण्यात तक्रारही घेण्यात आली नाही. अखेरीस मंजू कोयरी यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा कोयरी कुटुंबीयांचा दावा असला तरी चेंबूर पोलीस ठाणे त्याकडे लक्ष देत नव्हते. उलटपक्षी एका महिला अधिकाऱ्यानेच गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे कुटुंबीयांनी वरिष्ठ निरीक्षक भीमदेव राठोड ते उपायुक्त गौतम यांच्याकडे धाव घेतली. परंतु कुणीही दाद दिली नाही. आणि आता मिश्रा यांनी फेसबुकच्या माध्यमातून गौतम आणि राठोड यांचेच आभार मानल्यामुळे पोलिसांचेच बिंग फुटले आहे.

Story img Loader