मध्यरात्री झालेल्या एका अत्यंत गोपनीय हालचालीनंतर येथील बोर अभयारण्यातील एका पट्टेदार वाघाला पेंच राष्ट्रीय अभयारण्यात हलविण्यात आले आहे. बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्य़ात येते, पण त्यावर जिल्हा वन अधिकाऱ्याचा नव्हे, तर थेट मुख्य वनसंरक्षकांचा अधिकार चालतो. मुख्य वनसंरक्षक, तसेच पेंच राष्ट्रीय अभयारण्याचे संचालक एम.श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्वाखासलील चमूने वाघाचे असे स्थानांतरण केले.
गुरवारी पहाटेपर्यंत हे ऑपरेशन चालले. जंगलाच्या या राजाला एका मंत्र्याच्या इतमामाने पेंच प्रकल्पाच्या हवाली करण्यात आले. मुख्य वनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, पशूवैद्यकीय अधिकारी, वन व पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाहने, तसेच पिंजरा असलेली व्हॅन, असा सहा गाडय़ांचा ताफो बोर अभयारण्यातील एका निमुळत्या वाटेने पहाटे पेंचला पोहोचला. बोरमध्ये एक वाघ व दोन वाघीण आहेत. सप्टेंबर २००९ मध्ये चांदा वन विभागातील धाबा जंगलातील एका वाघिणीने तीन बछडय़ांना जन्म दिला होता. एक वर्षांचे झाल्यावर या तीनही बछडय़ांना सुरक्षेच्या कारणास्तव बोर अभयारण्यात आणण्यात आले होते. बोरमध्येच त्यांचा सांभाळ करण्यात आला. चार वर्ष झाल्यानंतर त्यांची पूर्ण वाढ झाल्याने त्यांना परत हलविणे गरजेचे ठरले. बोरचा वनविस्तार तुलनेने छोटा असल्याने या युवावस्थेतील वाघांना शिकारीचे कौशल्य आत्मसात करणे शक्य नव्हते. त्यामुळे वन्यजीव विभागाने त्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय घेण्याच्या काही आठवडय़ापूर्वी वन अधिकारी, पशूचिकित्सिक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असणाऱ्या सहा व्यक्तींच्या चमूने बोरला भेट देऊन वाघांची पाहणी केली. आरोग्य प्रमाणपत्र भेटल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात वरिष्ठांकडून स्थलांतराची परवानगी घेण्यात आली. प्रारंभी एका वाघाला हलविण्याचा निर्णय झाला. पुढील एक-दोन आठवडय़ात उर्वरित दोन वाघिणींना हलविले जाईल. पेंचच्या सुरक्षित व बंदिस्त क्षेत्रात त्यांना सध्या ठेवण्यात येणार असून तरबेज व सक्षम झाल्यावर तीनही वाघांना पुढील काळात वाघांची हजेरी नसलेल्या जंगलात सोडण्याची योजना आहे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ-कॉलर लावण्याची खबरदारी अपेक्षित आहेच.  जिल्हा वन अधिकारी चव्हाण यांनी या अत्यंत गुप्तपणे चाललेल्या ऑपरेशनबाबत बोलण्यास नकार दिला.
बोर आपल्या अधिकार क्षेत्रात नाही. त्यामुळे माझ्याकडे तपशील नाही, असे ते म्हणाले, तर या स्थलांतराचे सूत्रधार श्रीनिवास रेड्डी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यावर त्यांनी भाष्य करण्यास असमर्थतता दर्शविली. दहा दिवसानंतर याविषयी बोलू, अशी टिपण्णी त्यांनी केली. या ऑपरेशनमध्ये पाळण्यात आलेली अत्यंत गोपनीयता व घेण्यात आलेली खबरदारी वन्यप्रेमींनाही बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे, मात्र वाघांच्या बछडय़ांचे संगोपन करणारे बोर हे अभयारण्य असल्याचे यानिमित्याने स्पष्ट आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा