बाणेर रस्त्यावरील सहय़ाद्री मोटार्स या महेंद्र अँड महेंद्र शोरूमच्या मोकळ्या मैदानात किरकोळ कारणावरून एका सुरक्षारक्षकाने जवळच राहणाऱ्या एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये झाडलेली गोळी त्या व्यक्तीच्या दंडात घुसली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चतु:शृंगी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
प्रल्हाद जियालाल विश्वकर्मा (वय ३५, रा. सह्य़ाद्री मोटारसमोर, बाणेर रस्ता) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक सुरजित प्रेमसिंग (वय २५, रा. बाणेर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजित हा सह्य़ाद्री मोटार्स या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. विश्वकर्मा हे सुतारकाम करतात. ते शोरुमच्या समोर राहण्यास आहेत. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास शोरुमच्या मोकळ्या मैदानात सुरजित याचे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत भांडण सुरू होते. त्यावेळी विश्वकर्मा यांनी भांडण का करता असे विचारले म्हणून चिडलेल्या सुरजितने विश्वकर्मावर गोळी झाडली. ती त्यांच्या उजव्या हाताच्या दंडात घुसली असून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चतु:शंृगी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपी सुरजित याला अटक केली आहे.

Story img Loader