महापालिकेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेला बुरे दिन आल्याचे दिसून येत आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्याच्या नावाखाली महापालिकेत कार्यरत असलेले १०० खासगी सुरक्षांना कामावरून कमी करण्यात आले. महापालिकेची सुरक्षा आता अपुऱ्या सुरक्षांना करावी लागत आहे.
महापालिकेचे मुख्यालय, झोन कार्यालये, महापालिकेची उद्याने, शाळा व अन्य मालमत्तांच्या रक्षणासाठी महापालिकेने खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. मेस्कोसह अन्य दोन खासगी सुरक्षा कंपन्याकडून सुरक्षा रक्षक मागविण्यात आले होते. या व्यवस्थेमुळे महापालिकेच्या सुरक्षेसह अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था करामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. या अवस्थेचा पहिला फटका खासगी सुरक्षा रक्षकांना पडला आहे. विविध ठिकाणी नियुक्ती केलेल्या शंभर सुरक्षा रक्षकांची सेवा ११ जूनपासून बंद करण्यात आली आहे. तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येते. महापालिका मुख्यालयात मेस्कोचे १६ सुरक्षा रक्षक तैनात होते. मात्र, त्यातील ९ जणांची सेवा कमी करण्यात आली आहे. केवळ सातच सुरक्षा रक्षक सध्या प्रवेशद्वार, पार्किंग आणि महापालिेकेच्या मागच्या भागात आहेत. मुख्यद्वार आणि मागच्या प्रवेशद्वारावर केवळ एकच सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला आहे. या दोघांचा एकमेकाशी संपर्क नसतो. त्यामुळे एक जर संकटात सापडला तर दुसरा त्याच्या मदतीला धावू शकत नाही, अशी अवस्था आहे. झोन कार्यालयामध्ये दोन पाळ्यामध्ये प्रत्येकी एक आणि रात्रपाळीत दोन सुरक्षा रक्षक ठेवण्यात येत होते. आता मात्र तीनही पाळ्यामध्ये प्रत्येकी एकच सुरक्षा रक्षक ठेवण्यात येत आहे. म्हणजे प्रतीझोन एक याप्रमाणे १० सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले आहेत. उद्यान आणि अन्य महापालिकेच्या मालमत्तेच्या ठिकाणी असलेली सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे. महापालिकेच्या खासगी सुरक्षा कमी करण्याच्या प्रकारमुळे महापालिकेतील अन्य सुरक्षा रक्षकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर महापालिका प्रशासनाने व महापौर अनिल सोले यांनी तोडगा काढावा, अशी मागणी सुरक्षा रक्षकांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा