आठवीपर्यंत शिक्षण झालेले सुनील सोनटक्के उपजीविकेसाठी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असले तरी, रंगावलीचा छंद त्यांनी जोपासला आहे. नोकरीच्या वेळा सांभाळून ते रंगावलीच्या पायघडय़ा काढण्याचे काम करतानाच त्याला अनुसरून काव्यरचना करण्याचाही आनंद लुटत आहेत.
आईने प्रोत्साहन दिले म्हणून माझ्यातील कलाकार घडला, असे सुनील सोनटक्के यांनी सांगितले. आई आजारी असल्यामुळे घराच्या उंबऱ्यावर रांगोळी काढण्यासाठी रांगोळी हाती घेतली. सारसबागेमध्ये चतुर्थीला रांगोळी काढण्याचे काम १९८२ पासून करीत आहे. अतुल सोनवणे, अमोल मारणे, सागर राऊत, मंदार रांजेकर यांच्यासमवेत ‘मयूर रंगावली’ ही संस्था स्थापन केली.
रंगावलीच्या पायघडय़ा घालून पालख्यांचे स्वागत करताना मनस्वी आनंदाचे काम करीत असल्याची भावना आहे. भारतीय रंगावलीचे रामदास चौंडे हे मला गुरुस्थानी आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतींपुढे रांगोळीच्या पायघडय़ा हे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी असते. गुटखाबंदी, वृक्षतोड, स्त्री भ्रूणहत्या असे विविध विषय रंगावलीच्या माध्यमातून मांडताना समाजाचेही लक्ष या प्रश्नांकडे वेधल्याचे समाधान लाभते. या रांगोळीला अनुसरुन काव्यपंक्ती देण्याचे कामही माझेच. अशा रितीने माझ्या हातून काव्यरचना होत गेल्या. गेली चार वर्षे मी सह्य़ाद्री हॉस्पिटल येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहे.
कामाच्या वेळा सांभाळून उर्वरित वेळ रांगोळीच्या छंदासाठी हे मात्र ठरलेलेच असते, असेही त्यांनी सांगितले.    

Story img Loader