शेतकरी नजरा रोखून वाट बघत असलेल्या मृग नक्षत्राच्या आगमनाला आता फक्त आठ दिवस उरलेले आहेत. बाहेर रणरणत्या उन्हाचा तडाखा अद्याप कायम असताना गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढग जमू लागले आहेत. काल रात्री काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरीदेखील लावली. पावसाचा अचूक अंदाज बांधत पुढारलेल्या शेतकऱ्यांनी मशागतीचे काम सुरू केले आहे. मृग नक्षत्र लागताच विहिरी आणि इतर सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी सुमारे आठ हजार हेक्टरवर धान पिकाचे पेरणी टाकण्यात येणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
गोंदिया जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्प आणि इतर खासगी साधनांच्या आधारे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धानपीक, ऊस, कडधान्य आणि गळीत, तसेच पालेभाज्यांचे उत्पादन घेतले. आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्य़ातील एकूण २ लाख ७९२ हेक्टर जमीन पिकाखाली आहे. एकूण २ लाख ४८ हजार ४२३ शेतकरी असून त्यातील १ लाख ८७ हजार २४० अल्पभूधारक, तर १८ हजार ९६६ शेतकरी मोठे आहेत. खरीप हंगामात १ लाख ८५ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात येणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. जिल्ह्य़ात सद्यस्थितीत २ मोठे, ९ मध्यम, १९९ लघु व इतर सिंचनाच्या सोयी आहेत, तर ७ हजार ९६४ सिंचन विहिरींची नोंद आहे. असे असले तरी जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे खरीप हंगाम थेंब थेंब पावसाच्या पाण्यावरच मुख्यत: अवलंबून असतो.
मृग नक्षत्राची सुरुवात ७ जूनपासून होणार असल्याने बळीराजाने पेरणीकरिता जमिनीच्या मशागतीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्य़ात शेतीच्या बाबतीत अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुके प्रगत समजले जातात. इतर तालुक्यातील पेरणी मृग नक्षत्रानंतर दहा ते पंधरा दिवसांनी सुरू होते. मात्र, या दोन तालुक्यांमध्ये मृगाचा पहिला पाऊस पडला की, पेरणी सुरू करण्यात येते. दोन्ही तालुक्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला सुमारे ८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाचे पऱ्हे टाकण्यात येणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यावर्षी पावसाची स्थिती योग्य असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविले असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. उन्हाच्या असह्य़ झळा कायम असतानाही काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्यामुळे मृग नक्षत्रापर्यंत पाऊस पोहोचेल, असे समजण्यात येत आहे.
जिल्ह्य़ात धानपिकाची मोठय़ा प्रमाणात पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येते. एकच पीक घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने पिकांची लागवड करण्याकरिता कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच तृणधान्य, कडधान्य, ऊस, हळद, केळी यासारखे रोख पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्य़ात शासनाच्या विविध योजनांमार्फत सिंचनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्य़ातील २ मोठय़ा, ९ मध्यम, १९९ लघु व इतर, तसेच ७९६४ विहिरींच्या माध्यमातून ८६ हजार १९५ हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सोय उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
जिल्ह्य़ात तोतया कृषी अधिकाऱ्यांची टोळी
जिल्ह्य़ातील अनेक कृषी केंद्रांना भेटी देऊन बोगस कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्राची कागदपत्रे तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. ते कृषी केंद्र चालकांकडून पसे वसूल करण्याच्या बेतात असल्याने शेतकऱ्यांनी आणि केंद्र संचालकांनी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार झाला होता. आताही बोगस कृषी अधिकारी जिल्ह्य़ात फिरत असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांच्या नावाने दोन प्रकारचे शिक्के तयार करून या बोगस कृषी अधिकाऱ्याने जिल्ह्य़ातील १५-१६ कृषी केंद्रांना भेटी दिल्या. प्रथम भेटीत या तोतया अधिकाऱ्याने कृषी केंद्रचालकांवर आपला विश्वास बसावा, यासाठी ते विकत असलेल्या खतांच्या यादीवर विक्री रजिस्टरवर शिक्के मारून तपासणी केली तसेच या तोतया अधिकाऱ्याने आपल्या शर्टच्या खिशावर बोगस ओळखपत्रही लावले होते.
गोंदिया जिल्ह्य़ात मान्सूनपूर्वी आठ हजार हेक्टरवर पेरणी होणार
शेतकरी नजरा रोखून वाट बघत असलेल्या मृग नक्षत्राच्या आगमनाला आता फक्त आठ दिवस उरलेले आहेत. बाहेर रणरणत्या उन्हाचा तडाखा अद्याप कायम असताना गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढग जमू लागले आहेत.
First published on: 04-06-2013 at 09:37 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seed bowing on 8000 hectare before monsoon in gondiya distrect