सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत पाच कोटी २० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी अडकलेले शाखाधिकारी रविकांत बागल यांचा अद्याप शोध लागत नाही. त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघाने केली आहे.
बँकेच्या टेंभुर्णी शाखेत बागल हे शाखाधिकारीपदावर कार्यरत असताना त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून दहा कोटींपेक्षा अधिक रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यावर जमा केली होती. नंतर त्यांनी त्यापैकी पाच कोटी बँकेत जमा केले. उर्वरित पाच कोटी २० लाखांचा घोटाळा केल्याने त्यांच्यावर बँक प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्याविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु पोलिसांनी शोध घेऊनही बागल हे अद्याप सापडत नाहीत. एकीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरारी राहून पोलीस तपास यंत्रणेला गुंगारा देत असताना दुसरीकडे बँकेत घोटाळा झाल्याने बँक ठेवीदार व खातेदारांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
यासंदर्भात जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष मोहन मोरे व सरचिटणीस सुरेश पाटील यांनी शाखाधिकारी बागल यांच१ व त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे. शहरातील नेहरूनगर येथील बँकेचे निवृत्त शिपायांच्या कर्जावरील अवघे सहाशे रुपयांचे व्याज येणे असल्यामुळे संबंधित शिपायाच्या आश्रम शाळेतील कर्मचारी पत्नीचे वेतन सहा महिने रोखून धरण्यात आले होते. सदर व्याजाची रक्कम भरून घेतल्यानंतर सदर वेतन अदा केले गेले. तसेच बार्शीच्या आर्यन शुगर या खासगी साखर कारखान्याकडे ८२ कोटींचे कर्ज व ४ कोटींचे व्याज येणे होते. ही बाब बँकेच्या लेखापर१क्षणांमध्ये नमूद करण्यात आली आहे.  परंतु याबद्दल बँकेची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याचे शिक्षकेतर सेवक संघाने प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seize property of suspended branch officers