इचलकरंजीतील चार तरुणांकडून दोन गावठी बनावटीच्या पिस्तूलसह सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी जप्त केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तौफिक दस्तगीर मुल्ला (वय २४, रा .इंदिरानगर), मनीष नागौरी (वय २५ रा. सातारा), महेश अण्णासाहेब कोळी (वय २६, रा. लिगाडेमळा) व महेश बुचडे (वय २५) या आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी पोलिसांनी सातारा येथील आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
    शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गस्तीपथक पंचगंगा नदीघाट येथे गस्त घालत असताना दोघेजण संशयीतरीत्या फिरताना आढळले. त्यांची चौकशी करून तपास केला असता दोन गावठी बनावटीची पिस्तूल आढळून आली. तौफिक मुल्ला व महेश कोळी अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे दोन पिस्तूल, एक जिवंत काडतूस, १२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल्स, मोटारसायकल असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
    दोघा आरोपींना बोलते केले असता त्यांनी आपले आणखी दोन साथीदार असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी मनीष नागौरी व महेश बुचडे या दोघांनाही ताब्यात घेतले. या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. गावठी पिस्तूल विकणारी एक मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे, मात्र या संपूर्ण कारवाईबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता राखली होती.
 

Story img Loader