* वेदप्रकाश वैदिक विदर्भाचे नवे राज्यपाल
* आजपासून अधिवेशनाला सुरुवात
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रथम विधानसभेसाठी ६० आमदारांची निवड करण्यात आली असून उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांचीही निवड केली जाणार आहे.  मंत्रिमंडळाला राज्यपालांनी शपथ दिल्यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती विदर्भ कृती समितीचे संयोजक आमदार डॉ. अनिल बोंडे आणि अ‍ॅड. वामनराव चटप यांनी संयुक्तपणे आमदार निवासात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ राज्याचे राज्यपाल म्हणून पीटीआयचे माजी अध्यक्ष वेदप्रकाश वैदिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रतिरूप सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेले उमेश चौबे हे शपथ देतील. या ६० आमदारांमध्ये २० आमदार हे विरोधी पक्षांचे राहतील. त्यांना विदर्भ जन पक्षाचे आमदार संबोधले जाईल तर विदर्भ विकास पक्षाचे आमदार हे सत्ताधारी राहतील. प्रतिरूप विधानसभेला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्व आमदारांना पत्रे पाठविण्यात आल्याचेही अ‍ॅड. चटप यांनी सांगितले.
खामला चौकातील रॉयल पॅलेसच्या  सभागृहात विधानसभेचे कामकाज उद्या, सकाळी ११.३० सुरू होईल. नेता निवडीसाठी आमदारांची बैठक होईल. सकाळी ११.४५ वाजता राज्यपालांचा शपथविधी, दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी, १२.१५ वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड, १२.३० वाजता राज्यपालांच्या हस्ते नामनियुक्त एका सदस्याच्या नावाची घोषणा, १२.३० वाजता आमदारांचा शपथविधी आणि १२.४० वाजता मुख्यमंत्री सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून देतील. १२.४५ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने विधिमंडळाचे कामकाज सुरू होईल. दुपारी १ वाजता प्रश्नोत्तरे व त्यानंतर दुपारी २ वाजता स्थगन प्रस्ताव, औचित्याचे मुद्दे, चर्चा व मतदान होईल. दुपारी २.३० वाजता अर्थसंकल्प सादर होईल. यानंतर दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत माहिती देतील.
दुपारी ३.३० वाजता अर्थसंकल्पावर चर्चा व मतदान होईल. ६ वाजता लक्षवेधीवर चर्चा होईल. सायंकाळी ७ वाजता ठराव पारित केले जाईल. दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरू होईल. प्रश्नोत्तरानंतर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत अंतिम आठवडा प्रस्तावावर सविस्तर चर्चा होईल. या अधिवेशनानंतर तयार होणारा संपूर्ण अहवाल हा राज्य व केंद्र सरकारला पाठविला जाणार असल्याचे आमदार डॉ. बोंडे यावेळी म्हणाले.
उद्या, गुरुवारपासूनच संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. संसदेमध्ये तेलंगणाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. याबरोबरच स्वतंत्र विदर्भ मुद्दय़ावरही चर्चा झाली पाहिजे, अशी अपेक्षा चटप यांनी व्यक्त केली. विदर्भाच्या या प्रतिरूप विधानसभेत अर्थसंकल्प विकासात्मक राहू शकतो, हे या अधिवेशनातून बघावयास मिळणार असल्याचे मत शेतकरी नेत्या  सरोज काशीकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Story img Loader